जीवना देणे तुझे देवून झाले
कावळ्यांना पिंडही वाढून झाले
सावली गेली कुठे? बोलू कुणाला
चार भिंतींना व्यथा सांगून झाले
जाणते मी देह विक्रय पाप आहे
याच जन्मी नर्कही भोगून झाले
लोकलज्जेची उगा चर्चा कशाला?
लक्तरे वेशीवरी टांगून झाले
अस्तिनीतिल साप का दिसतो कधी? पण
वेदना डंखातल्या पचवून झाले
गारद्यांनी वार केले, काय त्याचे?
आपुल्यांचे घावही झेलून झाले
नेत्रदानाने खुशी प्रेतास माझ्या
आंधळ्यांना विश्वही दावून झाले
दोन वार्या नित्यनेमे पंढरीच्या
काय मागू? तृप्त मी, मागून झाले
तो विटेवर सर्वदा आहे उभा का?
मायबापाचे चरण चोपून झाले
व्यर्थ झटलो सोडण्या मी वाममार्गा
माळ तुळसीची गळा घालून झाले
निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com