आणले तारे नभीचे

आणले तारे नभीचे, ये घरी, घेवून जा
चांदण्यातिल आठवांना, तू इथे सोडून जा

तू मला पाषाण ह्रदयी का म्हणावे ना कळे
मी मऊ मेणाप्रमाणे, जाणण्या स्पर्शून जा

काय म्हणती लोक याचे भान ठेवावे किती?
श्वास घेण्या मोकळा तू बंधने तोडून जा

आरसा अय्याश आहे, घे सखे तू काळजी
चेहरा बघण्यास अपुला, ओढणी ओढून जा

सोड तू जगणे बघूनी, हस्तरेषा कुंडली
घे भरारी, प्राक्तनाला वाकुल्या दावून जा

आज जो उदयास आला, सूर्य तो आहे जुना
जन्म नवखा, तोच आत्मा, सत्त्य हे जाणून जा

ठेवली मी फक्त मागे, जन्म मृत्त्यू नोंद पण
आत्मवृत्तातील कोरे, पान तू चाळून जा

पुण्य करण्या वेळ कोठे? भूक जळता अंतरी
चित्रगुप्ता ईश्वराला, सत्त्य हे सांगून जा

कोंडले "निशिकांत" का तू दु:ख इतके अंतरी
ओघळू दे आसवांना, मोकळा होऊन जा

निशिकांत देशपांडे   मो. क्र. ९८९०७ ९९०२३