बांधले शेले कुणी?

भेटले जे त्यात नव्हते, धर्म शिकलेले कुणी
मंत्र पठणाचेच त्यांना बांधले शेले कुणी?

जन्मले मेले करोडो, ना कुठे पाउलखुणा
मज दिसेना कीर्तिरूपे आज उरलेले कुणी

शेत कसण्या लाज वाटे, शेतकी पदवीधरा
शिक्षणाचे तीन तेरा, का असे केले कुणी?

वेगळे का धुंद असते, विश्व रावांचे असे?
त्या मुजोरांना न दिसते, दीन रडवेले कुंणी

का असा अन्याय केला, भाग्य लिहिताना प्रभो?
नागडे जगते कुणी, सोन्यात मढलेले कुणी

कोण बघतो वाट आता यमदुताची या जगी?
पाहिले मरणाअधी मी, आज मेलेले कुणी

खेटरे पायात नव्हती, कोसले भाग्यास मी
दु:ख कळले पाहतांना, पाय नसलेले कुणी

लाचखोरांच्या विरोधी, पेटला वणवा तरी
खूप येते चीड बघता, षंढ निजलेले कुणी

कुंचल्याने रूप दे "निशिकांत" नवखे जीवना
टाळ नजरा भेटले जर, रंग विटलेले कुणी

निशिकांत देशपांडे  मो.क्र.  ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com