पहिली नोकरी

अरे बोंबल्या, आता १२ वी झाली.. बरीच सुट्टी पडली आहे. नुसतं घरी बसण्यापेक्षा जरा कुठेतरी काम कर, तितकीच आईला पण मदत होईल. झालं, अनेकांनी फुकटचे सल्ले देऊन देऊन माझ्या मनावर अगदीच दडपण आणलं. संदीप जिजाजींच्या ओळखीतून "नेसले" च्या एका होलसेल दुकानात नोकरी मिळाली. उद्यापासून रुजू व्हायचं होतं.
खेळ, निवांतपणा, झोपा, दंगा, गल्ली क्रिकेट ह्या सगळ्याला मी मुकणार होतो. माझे मित्र ह्या सगळ्या गोष्टी करणार होते. आणि त्या वेळात मी दुकानात काम करणार होतो.
"हरकत नाही, काय इतका फरक पडणारे? " अशी आज मी मनाची समजूत घालत बसलो होतो.  
कामाचं स्वरूप काही खास नव्हत. पुण्यातल्या अनेक खाऊ च्या दुकानात जाऊन त्यांना हव्या असेलल्या "नेसले" च्या मालाची यादी आणायची. त्याचबरोबर, आत्ता बरोबर नेलेला माल टेम्पो मधले २ हमाल  योग्य पद्धतीने त्या दुकानात नेऊन ठेवतात की नाही हे पहायचं होतं.
दुसरा दिवस उजाडला. मनात धाकधूक चालूच होती. पण मनावर अतिशय ताबा ठेवून मी आवरले. पहिला दिवस म्हणून नवीन कपडे घातले. आईला नमस्कार केला आणि सायकल वर टांग मारून दुकानाचा रस्ता धरला. पुणे स्टेशन च्या ऐरीआत ते गोडौन होतं. उशीर व्हायला नको म्हणून सपसप पाय चालत होते.
अखेर एकदाचा दुकानात पोचलो आणि मालकाला दर्शन दिले.
जे लोक टेम्पो मधून माल पोहोस्त करायला जातात, त्यांच्याशी त्यानी माझी ओळख करून दिली आणि सांगितलं, "बोम्बल्या", तुला आजपासून ह्यांच्याबरोबर जायचं बरका. मी आनंदाने होकारार्थी मान हालवली.
बार-वन, कीट-काट, मिल्कीबार, माग्गी चे डब्बे / पुडे टेम्पोमध्ये मोजून ठेवले. त्यानी व्यवस्थित हिशोब बजावून घेतला.  
टेम्पो निघाला, सोबत एक ड्रायवर आणि अजून एक मुलगा होता. ड्रायवर जरा वयानं मोठा आणि अनुभवी वाटत होता. 
तो दुसरा मुलगा मात्र माझ्यापेक्षा दोन एक वर्षांनीच मोठा वाटत होता. आम्ही दोघ त्या छोट्याश्या टेम्पोच्या आत अतिशय दाटीवाटीने बसलो होतो. आत अंधार भूडूक होता. टेम्पो कुठे चाललाय ह्याच काहीच भान नव्हतं.
एके ठिकाणी टेम्पो थांबला. आम्ही दोघं टुणकन उडी मारून खाली उतरलो.
तितक्यात ड्रायवरनि  मस्त ऑर्डर सोडली. " चलो, मी जो केहेता हू, वो सामान निकालके बाहर राख दो". 
त्यानी त्याच्याकडे असलेला एक कागद काढला आणि यादी वाचून दाखवली. आम्ही दोघांनी भराभर त्या वस्तू खाली काढल्या आणि त्या दुकानात नेऊन दिल्या. 
ड्रायवर नि दुकानातून त्या मालाचे पैसे घेतले आणि लगेचच आम्ही आमचा मोर्चा दुसरीकडे हालवला. पुढच्या अनेक दुकानात हेच घडले. तो सांगेल ते सामान बाहेर काढून  दुकानात नेऊन पोहोचते करायचे. आता मात्र मला जरा "कसतरी" च वाटायला लागलं. न राहवून मी त्या टेम्पो वाल्याला विचारलं. 
"अरे भैय्या, ये जो आप काम कर राहे हो, ये तो मुझे करने को बोला हे. और अब मे समज गया हू की क्या करना हे. 
लाईये, वो लिस्ट मुझे दे दिजीये. और आप सामान निकालीये. "
त्यावर तो एकदम उद्विग्न झाला. "जो बताया वो कर, ज्यादा दिमाग मत लडा. "
इथे मात्र मी एक फार मोठा आवंढा गिळला. आणि मुकत्यानं जे करायला लागेल ते करू लागलो. 
हेच काम करता करता दुपारचे ४ वाजले. एका हातगाडीवर एक वडापाव घेतला. आणि चहा मारला. अस झालं आमचं जेवण.
शेवटचे दुकान रविवार पेठेत होते. टेम्पोमध्ये उरलेले सगळे सामान मी पाठीवर घेतले आणि त्या गर्दीच्या रस्त्यामधून वात काढत त्या दुकानाकडे चालू लागलो. खूप दमलो होतो. शरीराचा अगदी "अवतार" झाला होता. 
 माल पाठीवर टाकून हळू हळू जात असतानाच, शेजारी एक हमाल पण चालताना दिसला. त्यानी सहजच माझ्याकडे पाहिलं. आणि म्हणाला, "काय र, पोरा? काय हाय काय त्या खोक्ष्यात? अन तुला पहिला नाय कदी इथं.. इथे कोणाकड हमाली करतोयस? "...  
ते शब्द कानावर पडताच माझ्या काळजात धस्स झालं.  
आपण कोण आहोत? काय करत आहोत? का करत आहोत? आपली हीच लायकी आहे का?.. अश्या अनेक विचारांनी मन कावरं-बावरं झालं. कसबसं ते सामान त्या दुकानात पोहोस्त करून दिलं. पळतच टेम्पोपाशी आलो. 
त्या वेळेतच दोघांनी उरलेली खोकी विकून ३० रुपये कमावले होते. प्रामाणिकपणे त्यांनी १० रुपये काढून मला दिले.
नाही घ्यावेसे वाटले मला. एकदम निर्जीव असल्यासारख्या सुरात मी म्हणालो, भैय्या चलो मुझे वापस अपने दुकान ले चलो. टेम्पोत बसलो आणि अखेर दुकानात पोचलो. 
जास्ती काहीच न बोलता सयकल काढली. जोडीदार बाहेरच उभा होता. "क्यो दोस्त? इतनी जल्दी? कल आनेवाले हो क्या? "..  
मी नकारार्थी मान डोलावली आणि डोळे पुसत घरचा रस्ता धरला.
माझ्या आयुष्यातली ही पहिली नोकरी मला बराच काही शिकवून गेली.