बंद का दार आहे?

मनाचे तुझ्या बंद का दार आहे?
आता प्रेम कसले? अहंकार आहे

जरी भोवती दाट अंधार आहे
तयाचाच मी हात धरणार आहे

शहाणी न बोलून आहेस तू पण
अबोला तुझा बोलका फार आहे

तुझा स्वार्थ प्रेमातही गुंतलेला
सुखांचा तुझ्या मी गुणाकार आहे

लिहू काय मी आत्मवृत्तात आता?
जगी प्रेम हा एक व्यवहार आहे

मनाने मनाला किती शांतवावे?
इथे वंचनांचाच बाजार आहे

अता सांगतांना मला मीच गोष्टी
उसास्यात मझाच हुंकार आहे

असा आरसा चेहरा टाळतो का?
तिरस्कार माझा पुरस्कार आहे

मनी पालही चुकचुकावी अशी का?
कमी आत्मविश्वास आजार आहे

किती ऐट "निशिकांत"ला शायरीची !
रुहानी ग़ज़ल हा अलंकार आहे

निशिकांत देशपांडे  मो. क्र. ९८९०७ ९९०२३