भांडवल

जिथे आयुष्यभर हरलो अता तेही सफ़ल झाले
कशाने एवढे सारेच माझे ग्रह प्रबल झाले?
तुझ्या श्रद्धांजलीचा शेर टाळ्या खेचतो आजी
तुझे मरणेच माझ्या गाजण्याचे भांडवल झाले
तुझ्याशी बोलणे आशय, तुझ्याशी भांडणे ही लय
तुझा सहवास असल्यानेच हे जगणे गझल झाले
तुझ्या दु:खामधे मनमोकळा रडणार होतो मी
कुणाच्या सांत्वनाने चित्त माझे चलबिचल झाले?
बिछाना मित्र झाल्यावर तुझ्यातिल काव्य जाणवले
जिणे संपायला आले नि आता मन तरल झाले
कशाला दार ठोठावेल त्याला आत घेतो मी?
किती सत्शील आहे कोण ते कोठे दखल झाले?
अगोदर मी तसा ’कणखर’ असे कार्यालयामध्ये
भितीने नोकरी जाईल ह्या इतके बदल झाले