सत्त्य मानले आभासाला

सत्त्य मानले आभासाला
दु:ख जरासे विसरायाला

नजरेमधले आर्जव बघुनी
स्वप्नी येई सहवासाला

रडवेला का असा चेहरा?
जीवन नाही कण्हावयाला

दु:खाविन का कधी झळाळी
लाभत असते मधुमासाला?

सावलीसही माझ्या कळले
दूर पाहिजे असावयाला

आत्मचरित्रा विराम देतो
काय राहिले लिहावयाला?

मला कशाला जागे केले?
किती तडे हे विश्वासाला !

गांधीवादी जरी मुखवटे
आशिर्वचने विध्वंसाला

आम्ही केले आज, उद्याच्या
किती कलंकित इतिहासाला !

"निशिकांता"ला आज कळाले
अपुले होते म्हणावयाला.

निशिकांत देशपांडे  मो.क्र. ९८९०७ ९९०२३