निरुत्तर

 मला आलेल्या  एका विरोपात तीन  व्यक्तींनी आपल्यासमोरील व्यक्तीचेच शब्द त्यांच्यावर उलटवून त्याना  कसे निरुत्तर केले याविषयी तीन अतिशय चांगले प्रसंग वर्णन  केले आहेत. (त्यातील दोन व्यक्ती तर अतिशय प्रसिद्ध आहेत.) मला खात्री आहे की मनोगतीना ते नक्कीच आवडतील.
                                                        -- १--
 फील्ड मार्शल सॅम माणेकशा एकदा गुजरातमध्ये अहमदाबाद येथे एका जाहीर सभेत भाषण करायला उभे राहिले. त्यानी इंग्रजीत बोलण्यास सुरवात केली त्याबरोबर श्रोतृवर्गातून एकदम जोरदार आवाज आला, "गुजरातीत बोला गुजरातीत बोला नाहीतर आम्ही भाषण होऊ देणार नाही. " ज. माणेकशा क्षणभर स्तब्ध उभे राहिले व श्रोत्यांकडे करड्या नजरेने पाहत त्यानी पुन्हा  इंग्रजीतच बोलण्यास सुरवात केली व ते म्हणाले, "मित्रानो, माझ्या लष्करी सेवेत मी अनेक लढाया खेळलो.त्या काळात मला सिख रेजिमेंटकडून पंजाबी शिकायला मिळाले. मराठा रेजिमेंटकडून मी मराठी शिकलो. मद्रास सॅपर्सकडून मला तमिळ तर बेंगाल सॅपर्सकडून बंगाली शिकायला मिळाले,बिहार रेजिमेंटकडून मी हिंदी शिकलो इतकेच काय पण गुरखा रेजिमेंटकडून मला नेपाळी भाषा पण शिकण्याची संधी मिळाली. " सॅम येथे एक क्षणभर स्तब्ध राहिले आणि पुन्हा आपली तीक्ष्ण नजर श्रोत्यांवर टाकत ते पुढे म्हणाले " पण दुर्दैवाने  संपूर्ण सेवेत एकही गुजराती सैनिक मला भेटला नाही की ज्याच्याकडून मी गुजराती शिकू शकलो असतो"  आणि सभेत टाचणी पडली तर आवाज येईल अशी शांतता पसरली.

                                                           ---२----
रॉबर्ट व्हायटिंग हे ८३ वर्षाचे अमेरिकन नागरिक पॅरिसला विमानाने आले. फ्रेंच कस्टम अधिकाऱ्यांनी त्याना पासपोर्ट दाखवण्यास सांगितले तेव्हा आपल्या सामानातून तो शोधायला त्यानी जरा वेळ घेतला त्यावेळी फ्रेंच कस्टम अधिकाऱ्याने जरा कुऱ्यातच त्याना विचारले, "आपण यापूर्वी कधी फ्रान्समध्ये आला होतात का ? " श्रीयुत व्हायटिंग यानी आपण एकदा पूर्वी आलो होतो असे सांगितले.
" तर मग आपण पासपोर्ट दाखवण्याची आवश्यकता आहे हे माहीत नव्हते का?"
" पण मागील वेळी मी येथे आलो तेव्हां मला दाखवावा लागला नाही " हे व्हायटिंग यांचे उत्तर ऐकून त्या अधिकाऱ्याचा पारा चढला व तो एकदम म्हणाला,
" शक्यच नाही असे काही घडणे अगदी अशक्य कोटीतील गोष्ट आहे. " त्या अमेरिकन ज्येष्ठ नागरिकाने खोचक नजरेने त्या अधिकाऱ्याकडे एक कटाक्ष टाकत उत्तर दिले,
" मी मागील वेळी म्हणजे १९४४ च्या डी डे ला तुमचा  देश जर्मनीच्या तावडीतून सोडवण्यासाठी आलेल्या सैनिकांच्या तुकडीत होतो आणि  फ्रान्सच्या किनाऱ्याला ओमाहा बीचवर पहाटे ४-४० ला आलो होतो त्यावेळी  एकही फेंच अधिकारी माझा पासपोर्ट पहायला तेथे हजर  नव्हता."आणि तेथे टाचणी पडली तर आवाज येईल अशी शांतता पसरली.

                                                    ३
अमेरिकन अध्यक्ष जॉन केनेडी यांचे सेक्रेटरी डीन रस्क साठीच्या दशकाच्या सुरवातीस फ्रान्समध्ये आले.त्यावेळी फ्रान्सचे अध्यक्ष डि गॉल यांनी नाटो मधून अंग काढून घेण्याचा निर्णय केला होता. त्यामुळे अमेरिकेने आपले सर्व लष्कर फ्रान्समधून ताबडतोब हलवावे असे त्यानी डीन रस्क यांना बजावले.यावर डीन रस्कनी विचारले,
"त्यामध्ये येथे पुरलेल्या १ लक्ष ऐंशी हजार सैनिकांचाही समावेश आहे का ? " आणि मग मात्र डि गॉल निरुत्तर झाले.आणि तेथे टाचणी पडली तर आवाज येईल अशी शांतता पसरली.