आमु आखा... १

© 2003 Dana Clark येथून साभार

***

फार फार जुनी गोष्ट आहे. अगदी शाळेमध्ये वगैरे असतानाची. शाळेच्या पुस्तकातून भाक्रा-नांगल, कोयना वगैरे मोठमोठ्या धरणांची माहिती आणि चित्रं वाचायला मिळायची. अवांतर वाचनाची खोड असल्याने ही धरणं आणि कारखाने वगैरे आधुनिक भारताची नवीन मंदिरं आणि तीर्थक्षेत्रं वगैरे आहेत अशा अर्थाचे पं. नेहरूंचे वक्तव्यही वाचले होतेच. अर्थात त्यावेळी हे सगळं माझ्यासाठी खूपच क्षुल्लक आणि एक अवांतर असंच होतं. कोयना धरणामुळे भूगर्भीय बदल झाले आहेत एवढीच त्या धरणाच्या पर्यावरणीय परिणामांची माहिती होती. माझ्यासाठी तो विषय तेवढ्यातच आणि तिथेच संपलेला होता.

कॉलेजमध्ये आल्यावरही काही फारसा बदल घडलेला नव्हता. मात्र तो पर्यंत एक नवीनच नाव, किंबहुना दोन नवीन नावं कानावर येऊ लागली होती. ती ही अधून मधून. फारशी नाहीत.

एक नाव होतं 'सरदार सरोवर प्रकल्प'. नर्मदा नदीवर एक विशालकाय धरण होणार आहे, आणि नर्मदेच्या प्रचंड प्रवाहाला बांध घालून ते पाणी गुजरातेत, मुख्यत्वे सौराष्ट्र आणि कच्छच्या वाळवंटात, नेऊन तिथे नंदनवन फुलवले जाणार आहे एवढेच ऐकू येत होते. भारताच्या आधुनिकतेकडे चाललेल्या घोडदौडीत, हा प्रकल्प म्हणजे एक महत्त्वाचा टप्पा ठरला होता.

येथून साभार

येथून साभार

नेमकं त्याच्याच आगेमागे अजून एक नाव ऐकू येऊ लागलं होतं. ते म्हणजे 'नर्मदा बचाओ आंदोलन'. हळूहळू मेधा पाटकर हे नावही गाजू लागलं. जे काही थोडंफार वर्तमानपत्रातून वाचलं त्यावरून फक्त एवढंच लक्षात आलं होतं की, 'हे सगळं वाटतंय तेवढं सरळ काम नाहीये. यात बरंच काही आणि बरंच खोल गुंतलेलं आहे. धरणामुळे नदीचे पाणी अडणार, त्यामुळे एक महाकाय मानवनिर्मित सरोवर तयार होणार, एक मोठा भूभाग पाण्याखाली जाणार आणि पर्यायाने काही लोकांचे विस्थापन होणार. नेमक्या याच मुद्द्यावरून आंदोलन होत आहे. पण सरकार त्या लोकांचे पुनर्वसन करेलच ना! असं कसं कोणी त्यांच्याकडे दुर्लक्ष करेल? लोकं काय काहीही मुद्दा घेऊन आंदोलन करतात. '

माझ्या दृष्टीने या सगळ्याचीच माझ्या आयुष्यातील व्याप्ती इथेच संपत होती. पुढे पुढे तर माध्यमांच्या लेखी हा मुद्दा डेड इश्यू झाला. मध्येच कधीतरी एखाद्या कोर्टात या प्रकरणाची तारीख असायची किंवा एखादा निर्णय यायचा तेव्हा काही दिवस परत काही वर्तमानपत्रांतून याबद्दल वाचायला मिळायचे. टीव्ही वाहिन्यांचे युग आल्यानंतर एखाद्या वाहिनीवर मेधाताई दिसायच्या, कधी गुजरात सरकारच्या अथवा दुसऱ्या कोणत्याही सरकारच्या प्रतिनिधीचा बाईट असायचा. मग परत शांत. असंच चालू राहिलं.

काही काळानंतर हे सगळं स्मृतीच्या एका अडगळीतल्या कप्प्यात जाऊन पडलं. आयुष्य पुढे जात राहिलं. मीही त्याच्यामागे लळतलोंबत ओढला जात राहिलो.

मराठी आंतरजालावर आलो तेव्हा काही ठळक डोळ्यात भरण्यासारखे लेखक भेटले. बरेचसे, काही घटका मनाला आनंद देऊन जाणारे लेखन करत. मात्र मनाला चटका लावणारं, अस्वस्थ करणारं लेखन करणारं एक नाव, त्यावेळी तर सातत्याने, समोर येत राहिलं. श्रावण मोडक. सुरुवातीला आलेली व्यक्तिचित्रं असोत किंवा पेवली असो. किंवा बाकीचं कोणतंही लेखन. आपण काहीतरी वेगळं, नेहमीच्या चाकोरीच्या बाहेर जाऊन घेतलेल्या अनुभवातून आलेलं वाचतो आहोत एवढं समजत होतं. पण हद्द झाली ती मात्र, अशातशाच आलेल्या नोंदींमुळे. एका संवेदनशील मनाने अतिशय डोळसपणे केलेल्या निरीक्षणातून नेमक्या टिपलेल्या या नोंदी. त्रास देऊन न जातील तरच नवल. या माणसाशी ओळख झाली आणि मग दाट मैत्रीही झाली. नेहमी बोलणं व्हायचं, क्वचित भेटीही. हळूहळू नर्मदेच्या तीरावर चाललेल्या संघर्षाची कहाणी तुकड्या तुकड्यातून समोर येत गेली. जुने सगळे संदर्भ जागे झाले. नवीन मिळालेल्या माहितीनुसार, हे आंदोलन म्हणजे नुसताच विकासाला विरोध नव्हे तर त्याला एक नवनिर्माणाची अशी पक्की बैठक आहे हे ही लक्षात येऊ लागले.

श्रावण म्हणायचा, "चल, एकदा जाऊन येऊ, बघून येऊ. प्रत्यक्ष बघून अजून सुस्पष्ट चित्र समोर येईल. " मलाही उत्सुकता होतीच. पण वाटायचं की त्या लोकांना भेटायला जायचं तर आहेच, पण ते काही प्राणिसंग्रहालय नाही. नुसती गंमत बघायला जायचं ठिकाण नाही. आपण काय करू शकतो त्याचं नक्की भान येऊ दे, अजून थोडे विचार सुस्पष्ट होऊ देत, मग जाऊ.

असं हो-नाही करता करता खूपच मोठा काळ गेला.

एके दिवशी अचानक एक मेल आलं. नर्मदा नवनिर्माण अभियानातर्फे चालवलेल्या जीवनशाळांना वीस वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने तिथल्या सर्व आजीमाजी विद्यार्थ्यांचा एक मेळावा ता. ७ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर २०११ या काळात आयोजित केला आहे. त्यातच युवकांसाठी शिबिर आणि अभ्यासवर्ग घेतला जाणार आहे. निमंत्रण अगदी आग्रहाचे होते. त्याशिवाय, इतस्ततः विखुरलेले बरेचसे लोक, कार्यकर्ते एकाच ठिकाणी भेटतील, गप्पा होतील आणि मग हे सगळं चहू अंगाने समजून घ्यायला सोपे जाईल असंही सगळे सांगत होते. जीवनशाळा या अतिशय आगळ्या वेगळ्या कामाबद्दल ऐकून तर खूप होतो, पण आधीच ठरलेल्या काही वैयक्तिक कार्यक्रमामुळे जाणे जमणार नव्हते. पुण्यातून श्रावण आणि अजून काही लोक जाणार होते. थोड्याशा खिन्नतेनेच उपस्थित राहू शकत नाही असे कळवले. पण मनात तीव्र इच्छा होतीच.

सहा नोव्हेंबरला, कौटुंबिक प्रवासातून मुंबईला परत येत असताना, अगदी ऐनवेळेस मनाने उचल खाल्ली. सगळ्या वैयक्तिक जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या होत्या. बायकोला सांगितलं, आता मला माझ्यासाठी चार दिवस दे. माझं, माझ्या आवडीचं आयुष्य मला जगू दे. चार दिवसांनी येतोच आहे परत. तिनेही फार खळखळ केली नाही. आयत्यावेळी धावपळ झाली खरी.

येथून साभार

एक तर हा सगळा कार्यक्रम होता धडगावात. नंदुरबार जिल्ह्यातलं एक तालुक्याचं गाव. तिथे कसं पोचायचं हेच मुळात माहीत नव्हतं. मी जिथून जाणार होतो तिथेही बरोबर येणारं कोणीच नव्हतं. पण एक एक संगती लागत गेली, व्यवस्था होत गेली, मार्गदर्शन झालं आणि केवळ दोन तासाच्या तयारीवर मी धुळ्याच्या बसमध्ये बसलो.

प्रवास जवळजवळ बारा चौदा तासांचा. आधी धुळे, तिथून शहादा आणि तिथून पुढे धडगाव. प्रत्येक ठिकाणी वाहन बदलत जायचं. सुदैवाने एस्टीच्या बसेस सतत उपलब्ध असतात. पहाटे धुळ्याला पोचलो. पुण्याचे लोक थेट शहाद्याला जाणाऱ्या बसमध्ये होते. त्यांचीही बस नेमकी त्याच वेळी धुळ्यात पोचली आणि माझी सोय झाली. त्यांना जॉइन झालो. तिथून पुढे सुरू झाला ग्रामीण भाग. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरलेली शेतं. पहाटेच्या संधिप्रकाशात हळूहळू जागी होणारी गावं. शहरी माणसाला भुरळ घालणारं वातावरण.

शहाद्यापर्यंत पोचेतोच आठ वाजले होते. धडगावची बस साडेआठला असते हे जाणकारांना माहीत होते. त्यामुळे तिखट तर्री मारलेले पोहे आणि गरमागरम चहा असा नाश्ता करता आला. बस अगदी वक्तशीर निघाली. सगळा मैदानी भाग. सपाटच्या सपाट पठार दूरपर्यंत पसरलेले. हळू हळू सांस्कृतिक बदल जाणवायला लागला होता. आदिवासी चेहरेमोहरे रस्त्यातून दिसत होते. लहान लहान वस्त्या, आटोपशीर घरं, त्या घरांवरून पसरलेले भोपळ्याचे वेल आणि त्यांना लागलेले गोल गरगरीत भोपळे.

शेतांमधून मुख्यत्वे कापूस आणि ऊस दिसत होता. शहाद्याच्या परिसरातील सूतगिरणी आणि साखरकारखान्याचा कच्चा माल. बहुतेक अंगणांमधून नुकताच कापणी केलेला आणि साठवलेला केशरी रंगाकडे झुकणाऱ्या पिवळ्या रंगाचा मका दिसत होता. आपण पहाडात चाललो आहोत पण पहाड मात्र अजून दिसेना असा विचार करेकरेतोच एकदम क्षितिजावर, अजस्र पसरलेली सातपुड्याची भिंत दिसायला लागली. श्रावण म्हणाला, "आलो आपण पायथ्याशी. एक एक पुडा ओलांडत अगदी तिसऱ्या चौथ्या पुड्याच्या आत जाणार आपण. " ते पहाड बघून तरी हे अशक्य वाटत होते. बस पहाडात घुसली, सराईत चालकाने पहिला गिअर टाकला आणि आम्ही घाट चढू लागलो.

अनंत वळणं घेत, धडगावात पोचेतो साडेदहा वाजले होते.

माझ्याबरोबर असलेले बहुतेक जणून तिथे बरेचवेळेला येऊन गेलेले. त्यांनी सराईतपणे धोकट्या खांद्याला लावल्या आणि एका चिंचोळ्या पायवाटेवरून चालायला सुरुवात केली. मी निमूटपणे त्यांच्या मागे मागे. मग कोणाच्या अंगणातून, कोणाच्या परसातून, कोणाच्या बकरीच्या नवजात पिल्लांवर पाय पडू नये अशी काळजी घेत आम्ही पाचेक मिनिटं चालत राहिलो.

काकावाडी, धडगाव. इथेच पोचायचं होतं. तिथेच 'नर्मदा परिवारा'चे मुख्यालय. पूर्वी भूदान चळवळीच्यावेळी विनोबाजी इथे आले होते. तेव्हा बांधलेले एक छोटेसे ऑफिस कम निवासी जागा. तिथेच आता नर्मदा परिवाराची ऊठबस आणि कामाचे मुख्य केंद्र. पोचलो तेव्हा तिथे खूपच लगबग चालू होती. लग्नघराचे स्वरूप आले होते. तरीही झालेले स्वागत खूपच मनापासून आणि जिव्हाळ्याचे होते. काही मंडळी कित्येक वर्षांनी एकमेकांना भेटत होती. त्यामुळे आनंद होताच. पण माझ्यासारख्या नवख्यालाही तिथे अगदी पाचेक मिनिटातच घरच्यासारखे वाटू लागले. अंघोळ वगैरे आटोपली. जेवणं झाल्यावरच मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार होती.

एवढं सगळं होताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली. शिबिराची व्यवस्था, शिबिरार्थींची व्यवस्था, आमच्या अंघोळीची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, कार्यक्रम जिथे होता तिथल्या व्यवस्थेचे अपडेटस, कार्यक्रमाला धुळ्याहून काही महनीय व्यक्ती आमंत्रित केल्या होत्या त्यांच्या आगमनावर लक्ष अशा बारीकसारीक गोष्टीत पूर्ण बुडालेली एक पांढऱ्या केसांची मध्यमवयीन व्यक्ती. मेधाताई. त्यांची माझी त्या आधी एकदाच, अगदीच छोटीशी भेट झाली होती. पण तरीही अगदी मुद्दाम जवळ येऊन 'अरे वा! तुम्हीही आलात. बरं झालं. भेट झाली परत. ' असं प्रेमळ स्वागत झालं. एवढंच नाही तर आमची व्यवस्था लागली की नाही यावर कटाक्षाने लक्षही ठेवले गेले.

नेतृत्वाचा वस्तुपाठ बघायला मिळत होता.

पहिल्या दिवशीचा कार्यक्रम होता, जीवनशाळेतील आजी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा. यानिमित्ताने आणि एकंदरच तीन दिवसात जीवनशाळांबद्दल खूपच माहिती कळली.

क्रमशः