रात्र सरली, तारकादल अस्त झाले

रात्र सरली, तारकादल अस्त झाले
आणि स्वप्नांवर पहारे सक्त झाले

काळजी ढळत्या वयाची काय त्यांना
ऐन तारुण्यात जे संन्यस्त झाले?

सांग, सामोरी कशी सूर्यास जाऊ?
काजव्यांवर रात्रभर आसक्त झाले

पोळते देहास झळ त्याच्या उन्हाची
तो समजतो लाजुनी आरक्त झाले

सोडविल आधारवड वेढ्यास अलगद
कल्पनेने, वेल मी, भयग्रस्त झाले

"दूर बहरोत्तर कसा वेलीस लोटू?"
ह्या विचाराने तरू संत्रस्त झाले

प्रत्यही घेते परीक्षा मी विषाची
वाटते लोकांस मदिरासक्त झाले