सिंदबाद

सिंदबाद...
एक वेडा खलाशी. समुद्रावर जातो म्हणून खलाशी म्हणायचं. वृत्ती तीच, भटक्याची, प्रवाशाची.
अमुक ठिकाणी "पोचणं" हे त्याचं उद्दिष्टच नसतं. त्याला फक्त तिथं "जाण्यात" मजा असते म्हणून जायचं असतं.
हरेक सफरीत काहीतरी वेगळं सापडेल म्हणून थेट नौका अथांग समुद्रात फेकणारा तो सिंदबाद. इतर खलाशी "बाप रे वादळ येतंय" असं म्हणताना हा "अरे व्वा! वादळ येतंय " म्हणत शिडांच्या जुळवाजुळवीला अफाट उत्साहाने लागणारा पठ्ठ्या.
वादळातून नाव काढल्यावर "वाचलो", "सुटलो" असे म्हणण्यापेक्षा "कसला थरार होता हा. " असे म्हणून रोमांचित होणारा व रूढ जगाच्या दृष्टीने गाढव. कधी गलबत उलटे होऊन बुडताना छोटी अरुंद नौका सोबत्यांसाठी ठेवून नजिकच्या बेटापर्यंत पोहत जायची हिंमत ठेवणारा धाडसी सिंदबाद. ह्या सगळ्या प्रवासात चित्रविचित्र अनुभव घेतलेला, तिलिस्मी तलवार सापडलेला, डाकूंशी आणि चाच्यांशी लढलेला, प्रसंगी घाव झेलून आपल्या सहकाऱ्यांना वाचवणारा हा सिंदबाद.
कधी अद्भुत जादूच्या, मायावी बेटावरून त्या दुष्ट जादूगाराच्या जाळ्यात त्यालाच अडकवत वठणीवर आणणारा चतुर सिंदबाद. कधी अजस्र माशांनी किंवा ड्रॅगनसदृश प्राण्यांनी गलबत घेरले गेले असताना गलबत वाचवणारा एक धाडसी, रोमांचवेडा, अल्पकालातच कंटाळणारा सिंदबाद.

प्रत्येक सफरीत आजवर कुणी न घेतलेले असे चित्रविचित्र पण समृद्ध अनुभवविश्व घेऊन, जीवाशी खेळ करून शेवटी सिंदबाद घरी येऊन पोचतो. ह्या अनुभवानंतर शहाण्याने तर प्रवासाचे पुन्हा नावच काढायला नको.
पण हा मात्र लागलीच "इथे राहून रोजच्या आयुष्यात करायचे काय" असे म्हणत उपलब्ध असलेल्या चारचौघांसारख्या स्थिर पण चौकटीबद्ध आयुष्याला कंटाळत पुन्हा लागलीच पुढच्या प्रवासाची बांधाबांध करू लागतो.

एकाच सफरीत भरपूर धनवान झाल्यानंतर तो घरी थांबू शकला असता, पण "घर" हे ही त्याच्यासाठी "बेट"च होते.
बेटावर फक्त काहीकाळ मुक्काम करायचा असतो; तो केवळ पुढल्या भ्रमणाला निघायला हेच पायाला भिंगरी लावलेल्या अस्सल खलाशाला समजते. तो पुढचीही सफर पूर्ण करून पुन्हा त्या "बेटावर" यायचं ठरवतो आणि तयारीला लागतो.

आपल्या सगळ्यातच हा सिंदबाद असतोच. जितके लहान वय तितका तुमच्यात सिंदबाद जास्त. एकाच ठिकाणच स्थिरत्व त्याला कंटाळवाणं वाटतं, जडत्व वाटतं. नाही ती संकटं अंगावर ओढवून घ्यायची आणि मग स्वतःच लढून ती सोडवायची आणि वर ह्यानं खूश, उत्तेजित, रोमांचित होत पुढल्या संकटात घुसायचं एवढंच त्याला समजतं. बालपणी नाही का "बाऊ आहे हां तो" म्हटले तरी चटका बसल्याशिवाय बाळाला अक्कल येत नाही, किंवा रोज खरचटून, धडपडून घेतलं तरी खेळायचा उत्साह काही कमी होत नाही तसंच.
अशा सिंदबादना सुरक्षित आणि सामान्य प्रवासच मंजूर नसावा. त्यांना हवे ते अंगावर येणारे roller coaster सारखे आयुष्यात येणारे अनुभव.

संथ व शांत आयुष्यात ह्यांची अवस्था एकच....
"'आहे मनोहर तरी गमते उदास"....
आहे ते उत्तम आहे, पण अजून काही तरी हवंय. सोबतच्यांना ते "तुम्ही चांगले आहात, पण तुम्ही मला आता हवे आहात तसे नाही आहात" असे म्हणत ते मांडलेला डाव सोडून दुसऱ्या भिडूशी नव्याने भिडतात. कोण वाईट, कोण चांगले, कोण शहाणे कोण पांगला असा विचार "शहाणी" माणसे करतात, करतच राहतात आणि ह्या "वेड्याचे" तेव्हढ्यात सात प्रदीर्घ समुद्रसफरी पूर्ण होतात देखील.

Good bye Cognizant. माझ्यातला सिंदबाद उचकलाय.
सफरीतून जगलो वाचलो तर पुन्हा तुला भेटायला येईनच.
तू छानच आहेस. दोनेक महिन्यात नव्या सफरीला निघतोय, नवीन बेटाच्या ओढीने.