मीच माझे पाहतो आता

प्रेम केल्याची सजा मी भोगतो आता
सोड चिंता मीच माझे पाहतो आता

मी जसा आहे तसा रुचलो न कोणाला
चेहर्‍यावर मुखवटे मी लावतो आता

सुरकुत्यांचे राज्य आले सांजही झाली
आरशातिल मी मला ना भावतो आता

गाठले ध्येयास, थोडे शांत जगण्याला
काय पुढती? उत्तरे मी शोधतो आता

अंतरी डोकावसी का? मी रिता प्याला
धुंद मी होण्यास गझला वाचतो आता

मानले सर्वास अपुले चूक मी केली
घेत शिक्षा मी मला फटकारतो आता

झोपड्या सार्‍या जळाल्या दंगलीमध्ये
शांततेची बात करतो गाव तो आता

शामची आई विसरलो, पावाणार्‍या त्या
मी भवानीचाच गोंधळ मांडतो आता

संपली दु:खे, प्रभूची कास धरल्याने
किर्तनी रंगून थोडा नाचतो आता.

निशिकांत देशपांडे.  मो.क्र. ९८९०७ ९९०२३