स्वप्नी तुझिया दिसेन मी ( मतलाबंद ग़ज़ल )

दार किलकिले ठेव सख्या तू डोकाउन तुज बघेन मी
झोप असूदे तुला लागली स्वप्नी तुझिया दिसेन मी

मनातले ते व्यक्त कराया तुझी राधिका बुजेन मी
लाज वाटते हाक मारण्या मंदमंद दरवळेन मी

आनंदीआनंद बरसता कोरडी कशी उरेन मी?
श्रावणातल्या सरीप्रमाणे तुला चिंबवून भिजेन मी

आठवणीचा दाह कितीही मला छळूदे, हसेन मी
झुळूक होउन तुझ्याभोवती थंड गारवा असेन मी

खाचा खळगे जीवन मार्गी मनात भिती पडेन मी
हात मला दे घट्ट धराया क्षितिजावरती फिरेन मी

चर्चा करण्या दोष कुणाचा, आसपासही नसेन मी
असेल चुकले माझे समजुन माझ्यावरती रुसेन मी

तुझीच बाजी सदा असूदे खुशीखुशीने पिसेन मी
डाव खेळता तुझीच राणी हुकुमी पत्ता बनेन मी

प्रसंग येता जगास सार्‍या पुरून बाकी उरेन मी
ध्येय असूदे ऊंच तुजसवे हिमालयावर चढेन मी

किती लळा "निशिकांत" लावला! प्रेमसागरी बुडेन मी
जन्मोजन्मी खरेच तुझिया ग़ज़लांमधुनी झरेन मी

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३