खड्यांच्या मुगुटाची गोष्ट (३)

मी रात्री साडेबारापर्यंत होम्सची वाट बघत बसलो होतो. पण त्याचं घरी
परतण्याचे काही चिन्ह दिसेना. त्याला ताजा माग लागलेला असला की दिवस
रात्रीची फिकीर न करता अनेक दिवस आणि अनेक रात्री तो गायब असायचा. या
गोष्टीची मलाही चांगली सवय झाली होती. त्यामुळे जास्त काळजी करायच्या फंदात
न पडता मी माझ्या खोलीत जाऊन झोपलो. होम्सला घरी यायला किती वाजले कोणास
ठाऊक! पण सकाळी न्याहारीसाठी मी खाली आलो तर स्वारी प्रसन्न मुद्रेने
टेबलावर बसलेली होती. एका हातात कॉफीचा कप आणि एका हातात ताजे वर्तमानपत्र
घेऊन दोन्हींचा आस्वाद घेणे चाललेले होते.

"वॉटसन, मी तुझ्यासाठी
थांबलो नाही याचा राग मानू नकोस. आपले सावकारबुवा आज सकाळी सकाळीच
आपल्याला भेटायला येणारेत हे विसरून चालायचे नाही. " तो मला म्हणाला.

"हो खरेय. अरे, नऊ वाजून गेलेत आणि ही बघ दारावरची घंटा वाजली. तेच आले असणार. "

आलेले
पाहुणे म्हणजे आमचे मित्र सावकारबुवाच होते. एका दिवसभरात त्यांच्या
चेहऱ्यात पडलेला फरक पाहून मला धक्काच बसला. त्यांची रुंद आणि भारदस्त
वाटणारी चर्या आज चिमटली होती आणि पडलेली दिसत होती. त्यांचे केसही अचानक
पांढरे झाले होते. काल सकाळी ते जितक्या तावातावाने आमच्याकडे आले होते
तितकेच आज ओढगस्तीला लागल्यासारखे स्वतःला ओढत ओढत ते आत आले आणि मी पुढे
केलेल्या खुर्चीमध्ये मटकन बसले.

"मी काय पाप केलेय म्हणून हे
भोग माझ्या वाटेला आलेत काही कळत नाही. दोन दिवसांपूर्वीपर्यंत मी एक सुखी
समाधानी आणि श्रीमंत माणूस होतो. आयुष्यात कसली चिंता नव्हती. आणि आज अचानक
मला कुठे तोंड दाखवायला जागा उरलेली नाही. या वयात आता मी कशाकशाला तोंड
देऊ? संकटेही एकामागून एक येऊन कोसळताहेत माझ्यावर. माझी पुतणी मेरी घर
सोडून पळून गेली आहे. "

"पळून गेली? "

"हो. पळून गेली.
आज सकाळी आम्ही पाहिले तर तिची खोली रिकामी होती. तिच्या अंथरुणात कोणी
झोपल्याच्या काही खुणा नव्हत्या. आणि माझ्यासाठी एका चिठोऱ्यावर एक निरोप
लिहिलेला होता. काल रात्री दुःखाच्या भाराखाली दबून जाऊन मी तिला म्हणालो
होतो की तिने जर माझ्या पोराशी लग्न केले असते तर आज हा प्रसंग ओढवला नसता.
खरे सांगतो हो, मी हे चिडून वगैरे बोललो नव्हतो. बहुतेक असे बोललो ही माझी
चूकच झाली. माझ्या त्याच बोलण्याचा तिने यात उल्लेख केलाय. हा बघा-
         प्रिय काकासाहेब, माझ्यामुळे तुम्ही मोठ्या अडचणीत सापडलात आणि मी जर अशी वागले
    नसते तर आज परिस्थिती काही वेगळीच असती यात शंका नाही. या सगळ्याला मी कारणीभूत
    आहे हा विचार माझ्या डोक्यात आल्यापासून मला तुमच्या छपराखाली राहणे अशक्य झाले आहे.
    त्यामुळे मी हे घर कायमचे सोडून जात आहे. माझी काळजी करू नका. माझ्या निर्वाहाची सोय
   झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा शोध घेण्याचा प्रयत्न करू नका कारण त्याचा
   काही उपयोग होणार नाही. आणि ते मला आजिबात आवडणार नाही. -जिवंतपणी आणि
  मेल्यावरही कायम तुमच्या ऋणात असणारी तुमची मेरी.   

"होम्स साहेब, तुम्हाला काय वाटते, याचा काय अर्थ आहे? मेरीने स्वतःच्या जिवाचे काही बरेवाईट तर केले नसेल ना? "

"छे छे! मला तर वाटतेय की हाच सगळ्यात सोपा उपाय आहे. तुमच्यावर आलेले संकट आता संपल्यात जमा आहे. "

"काय सांगता!! म्हणजे तुम्हाला काहीतरी कळालेय. सांगा लौकर सांगा कुठेयत ते खडे? "

"ते खडे परत मिळवण्यासाठी एकरकमी हजार पौंड भरावे लागले, तर तुमच्यासाठी ती खूप मोठी रक्कम आहे का? "

"अहो मी दहा हजार पौंडास सुद्धा आनंदाने द्यायला तयार आहे"

"एवढ्या
पैशांची गरज नाही पडायची. तीन हजार पौंडात ते काम होईल. पण इथे थोडा जास्त
खर्च करावा लागणार आहे. तुम्ही तुमचे चेक बुक आणले असेलच ना? मग मला चार
हजार पौंडांचा धनादेश लिहून द्या बरे! "

सावकारबुवानी दिग्मूढ होऊन या
रकमेचा धनादेश होम्सच्या हाती दिला. होम्सने आपल्या डेस्काचे झाकण उघडून
एक लहानशी पर्स बाहेर काढली आणि त्यातून एक सोन्याचा त्रिकोणी तुकडा बाहेर
काढला. त्याच्यावर तीन वैदूर्याचे खडे चमचम करत होते. होम्सने तो तुकडा
टेबलावर ठेवला.

एक किंकाळी फोडून सावकारबुवांनी तो तुकडा उचलून घेतला.

"तुम्हाला सापडला हा! मी वाचलो.. मी वाचलो!!! "

तो
तुकडा गायब झाल्यावर त्यांना जितकी जोराने दुःखाची उबळ आली होती तेवढाच
त्यांचा आनंदही जोरदार होता. त्यांनी दोन्ही हातांनी तो तुकडा उराशी धरून
ठेवला होता.

"तुमची देणी अजून संपलेली नाहीत होल्डर साहेब. " होम्स कोरडेपणाने, खरे म्हणजे तुसडेपणाने हे वाक्य म्हणाला.

"देणी" काय रक्कम आहे? सांगा मला. मी लगेच भरतो. " आपल्या पेनाचे टोपण काढत होल्डर म्हणाले.

"नाही
या बाबतीत तुम्ही मला नाही देणे लागत. तुमच्या मुलाची तुम्ही क्षमा
मागायला हवी. तुमचा मुलगा म्हणजे चोख सोने आहे. हे प्रकरण त्याने इतक्या
कौशल्याने हाताळलेय, की देवाने माझ्या नशिबी एखाध्या मुलाचा बाप होणे लिहिले असेल, तर त्याच्यासारखाच मुलगा माझ्या पोटी यावा असे मी देवाकडे मागेन. "

"याचा अर्थ, आर्थरने ते खडे चोरले नाहीत? "

"मी कालही म्हणालो होतो आणि आजही तेच म्हणेन की आर्थर यात संपूर्णपणे निर्दोष आहे. "

"तुम्ही खात्रीने सांगताय? चला मग आपण लगेच आर्थरकडे जाऊ. त्याला सांगू की खरे काय ते आपल्याला कळालेय"
त्याला
याची पूर्ण कल्पना आहे. काल हा सगळा गुंता सोडवल्यावर मी पोलीस चौकीत जाऊन
त्याला भेटलो. तो आपले तोंड उघडायला तयार झाला नाही. मग मीच झालेला प्रकार
त्याला सांगितला. शेवटी त्याला सगळे मान्य करावे लागले. आणि काही
मुद्द्यांबद्दल मी स्वतः अंधारात होतो, तेही त्याने स्पष्ट करून सांगितले.
आज सकाळी घडलेल्या प्रकारानंतर मात्र तो याबद्दल बोलेल असा माझा अंदाज आहे.
"

"हे सगळे काय रहस्य आहे सांगा तरी एकदा मला"

"सांगतो.
सगळे सांगतो. शिवाय मी कसा कसा या निष्कर्षांपर्यंत येऊन पोचलो तेही
सांगतो. सगळ्यात आधी अशी गोष्ट सांगतो, जी मला सांगायला आणि तुम्हाला
ऐकायला अतिशय वेदनादायक आहे. सर जॉर्ज बर्नवेल आणि तुमची पुतणी मेरी
यांच्यात संगनमत झालेले होते आणि आता ते दोघेजण एकत्रितपणे फरारी झाले
आहेत. "
"मेरी? शक्यच नाही! "

"हे शक्य आहे, नव्हे हेच सत्य
आहे. तुम्ही आणि तुमच्या मुलाने आपल्या घराचे दरवाजे बर्नवेलसाठी उघडलेत
तेव्हा तो किती उलट्या काळजाचा नराधम आहे याबद्दल तुम्हाला किंचितही कल्पना
नव्हती. हा माणूस इंग्लंडमधल्या सगळ्यात धोकादायक माणसांमधे मोडतो. तो अट्टल जुगारी आहे आणि
तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. अगदी कुठल्याही थराला. त्याच्याजवळ दया
नाही, माया नाही. तो अगदी निर्दय आणि निर्ढावलेला बदमाश आहे एक नंबरचा.
मेरीला या सगळ्याची काहीच कल्पना नव्हती. आजवर त्याने शेकडो मुलींना आपल्या
नादी लावून फसवलेले आहे. मेरीवरही त्याने हाच प्रयोग केला. तिला बिचारीला
वाटले, बर्नवेलच्या काळजावर फक्त तिलाच कब्जा करता आलाय. तो तिच्याशी असे
काय बोलला देवास ठाऊक, पण मेरी त्याची हस्तक झाली होती. रोज रात्री नियमाने
ती बर्नवेलला भेटत असे. "

"हे शक्य नाही. यावर विश्वास ठेवणे शक्य नाही... " होल्डर साहेबांच्या चेहऱ्याचा रंग उडालेला होता.

"ठीक आहे, मग परवा
रात्री तुमच्या घरी नेमके काय घडले ते मी तुम्हाला सांगतो. मेरीला वाटले,
की तुम्ही तुमच्या खोलीत जाऊन झोपला आहात. त्यानंतर ती घराच्या मोठ्या
खिडकीत उभी राहून तबेल्याकडे जाणाऱ्या आळीत उभ्या असणाऱ्या आपल्या याराशी
गप्पा मारत होती. तो इतका वेळ तिथे खिडकीखाली उभा होता, की त्याच्या
पावलांचे अगदी स्पष्ट ठसे एवढ्या बर्फातही खिडकीखाली दिसत होते. मेरीने
त्या मुगुटाबद्दल त्याला सांगितले. त्याला सोन्याच्या वस्तूंबद्दल फार
आकर्षण आहे. त्याने मेरीचे मन वळवले. माझी खात्री आहे की मेरीचा तुमच्यावर
खूप जीव होता पण काही मुलींना आपल्या प्रेमपात्रापुढे सगळे जग तुच्छ वाटते.
मेरीही त्यातलीच निघाली. काय करायचे हे बर्नवेल मेरीला समजावून सांगत
असतानाच तुम्ही खाली आलात. मेरीने घाईघाईने खिडकी लावून घेतली आणि एक पाय
लाकडाचा असणाऱ्या आपल्या प्रियकराला भेटायला गेलेल्या तुमच्या मोलकरणीवर
सगळे काही ढकलून दिलेन. त्या मोलकरणीचे प्रेमप्रकरण मात्र खरे आहे. "

"तुमचा
पोर आर्थर तुमच्याशी वाद झाल्यावर निमूटपणे खोलीत जाऊन झोपला. पण
क्लबातल्या देण्यांबद्दलच्या चिंतेमुळे त्याला नीटशी झोपच लागली नाही.   
मध्यरात्रीच्या सुमाराला त्याच्या कानावर दबक्या पावलांचा आवाज आला.
कोणीतरी त्याच्या खोलीच्या दाराबाहेरून जात होते. तो खडबडून जागा झाला आणि
त्याने कुतूहलाने बाहेर डोकावून पाहिले. साक्षात आपल्या बहिणीला तिथे बघून
त्याला धक्काच बसला. आणि आपली बहीण दबक्या पावलांनी चोरटेपणाने चालत चालत 
आपल्या वडिलांच्या कपडे करण्याच्या खोलीत गेलेली पाहून तर त्याच्या
आश्चर्याला पारावार राहिला नाही. त्याने घाईघाईने हाताला आले ते कपडे
अंगावर चढवले आणि हा सगळा काय प्रकार आहे ते शोधून काढायच्या उदेशाने
अंधारात जाऊन उभा राहिला. काही वेळातच मेरी तुमच्या कपडे करण्याच्या
खोलीतून बाहेर आली. बोळकांडीतल्या मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात तिच्या
हातात तो अमूल्य मुगूट आर्थरला दिसला. भयाने आर्थरचा थरकांप झाला. त्याही
अवस्थेत त्याने मेरीचा पाठलाग केला आणि तुमच्या खोलीच्या दाराबाहेर
लावलेल्या पडद्याच्या आडोशाने तो पुढे काय होते ते बघायला उभा राहिला.
तिथून खालच्या हॉलमधले दृश्य त्याला दिसत होते. मेरी चोरट्या पावलांनी जिना
उतरून खाली गेली. तिने आवाज न होऊ देता हॉलची मोठी खिडकी उघडली आणि बाहेर
उभ्या असलेल्या  माणसाच्या हातात तो मुगूट सोपवला. मग तिने पुन्हा
हळुवारपणे खिडकी लावून घेतली आणि  ती आपल्या खोलीत परत गेली. तिच्या वाटेत
अगदी जवळच पडद्यामागे उभ्या असलेल्या आर्थरने हा सगळा प्रकार प्रत्यक्ष
पाहिला. "

"आर्थरचा मेरीवर जीव होता आणि ती आपल्या खोलीत
पोचण्यापूर्वी जर त्याने काही हालचाल केली असती, तर तिची चोरी उघडकीला आली
असती. आर्थरला हे नको होते. पण ज्या क्षणी मेरी सुखरूप आपल्या खोलीत पोचली
त्या क्षणी आर्थरला झाल्या प्रसंगाची जाणीव झाली. हे सगळे प्रकरण तुमच्या
दृष्टीने किती भयंकर होते आणि ते वेळीच निस्तरणे किती गरजेचे होते हे
त्याला कळून चुकले. तो तसाच अनवाणी पावलांनी खाली धावला, खिडकी उघडून
त्याने रस्त्यावर उडी मारली आणि तबेल्याकडे जाणाऱ्या आळीत साचलेल्या
बर्फातून धावत सुटला. चांदण्यात त्याला एक काळी आकृती त्या आळीमध्ये
चालताना दिसत होती. सर जॉर्ज बर्नवेलने पळून जायचा प्रयत्न केला पण आर्थरने
त्याला गाठलेन. दोघांची मारामारी जुंपली. एका बाजूने तुमचा पोर आणि
दुसऱ्या बाजूने बर्नवेल अशा दोघांनी त्या मुगुटाची खेचाखेची सुरू केली. या
मारामारीमध्ये आर्थरचा जोराचा फटका बर्नवेलच्या डोळ्यावर बसला आणि त्याच्या
जखमेतून रक्त वहायला लागले. अचानक कसलातरी आवाज झाला आणि सगळाच्या सगळा
मुगूट आर्थरच्या हातात आला. मुगूट हातात आल्याअल्या आर्थर उलटपावली घरी
आला,    खिडकी लावलीन आणि जिना चढून तुमच्या खोलीत शिरला. तुमच्या खोलीत
आल्यावर त्याच्या लक्षात आलं की या मारामारीमध्ये तो मुगूट पिळवटला आहे आणि
मुगूट सरळ करायला तो धडपडत असतानाच तुम्ही खोलीत प्रवेश केलात. "

"असे घडू शकते? " सावकारबुवांना धाप लागली होती.

"तुम्ही
पुढे होऊन त्याची पाठ थोपटायला हवी, त्याचे मनापासून आभार मानायला हवेत 
अशी त्याची अपेक्षा असताना तुम्ही त्याला नावे ठेवायला सुरुवात केल्यावर तो
खूप संतापला. या प्रकरणातला खरा चोर कोण आहे हे सांगितल्याशिवाय तो खरी
गोष्ट तुम्हाला सांगू शकत नव्हता. मेरीसाठी त्याने एवढे बलिदान द्यावे अशी
खरोखरी तिची लायकी नाही. पण आर्थरने मात्र मोठ्या शूरपणाने परिस्थितीला
तोंड दिले आणि मेरीचे नाव फुटू दिले नाही. "

"मुगूट पाहून मेरी
किंचाळली आणि बेशुद्ध पडली त्याचे कारण हे होते होय! अरे देवा!!   डोळे
असून आंधळा आणि इतका शतमूर्ख माझ्याइतका मीच असेन बहुतेक. आणि तो बिचारा
पोर पाच मिनिटांसाठी बाहेर जाऊ द्या म्हणत होता ते मारामारीच्या जागी तो
तुकडा पडा असेल तर शोधायला. मी माझ्या पोराशी फारच क्रूरपणे वागलोय.
त्याच्यावर फार मोठा अन्याय केला आहे मी" सावकारबुवा हताश होऊन म्हणाले.

होम्सने
बोलायला सुरुवात केली. "मी जेव्हा काल सकाळी तुमच्या घरी आलो, तेव्हा मी
घराच्या आवारात साठलेल्या बर्फामध्ये चौफेर फेरी मारून कुठे पावलांचे ठसे
दिसतात का ते शोधत होतो. अगदी डोळ्यात तेल घालून मी ही तपासणी केली कारण हे
पावलांचे ठसे फार उपयोगी ठरणार होते. शिवाय मला ही गोष्ट निश्चितपणे माहीत
होती, की आधल्या दिवशी रात्री नव्याने बर्फ पडलेला नव्हता, पण रात्रीचे
तापमान इतपत थंड होते की साठलेले बर्फ वितळून जाऊ शकणार नाही. त्यामुळे
बर्फात जर ठसे उमटले असतील तर ते सुरक्षित असायला हवे होते. घराकडे
येणाऱ्या फेरीवाल्यांच्या वाटेची मी पाहणी केल्यावर माझ्या असे लक्षात आले,
की तिथे सगळ्याच ठशांचा चांगलाच गुंताडा झाला होता. त्या वाटेवर,
स्वयंपाकघराच्या विरुद्ध दिशेला मला एका बाईच्या पावलांच्या खुणा सापडल्या.
त्या बऱ्याच स्पष्ट होत्या. तिथे बर्फात उभी राहून ती बाई एका माणसाशी
काही वेळ बोलत होती असे दिसत होते. त्या माणसाच्या पावलांपैकी एक पाऊल
आकाराने गोल होते. त्यावरून मी असा निष्कर्ष काढला, की त्याचा एक पाय
लाकडाचा असावा. त्या खुणांवरून असेही दिसत होते, की त्यांच्या गप्पांमध्ये
काहीतरी व्यत्यय आला असावा. अचानक ती बाई स्वयंपाकघराच्या दिशेने पळाली
होती. तिच्या चवड्यांकडे स्पष्ट आणि खोल तर टाचेकडे पुसट अशा पाऊलखुणांवरून
मी हा निष्कर्ष काढला. तो माणूस थानंतर थोडा वेळ वाट बघत तिथेच उभा होता
पण शेवटी तो निघून गेला. तुम्ही आपल्या मोलकरणीबद्दल मला बोलला होतात. मी
असा अंदाज बांधला की या खुणा तुमची मोलकरीण आणि तिच्या मित्राच्या असल्या
पाहिजेत. आणि माझा अंदाज खरा आहे असे चौकशी केल्यावर आढळून आले. मी जेव्हा
बागेची पाहणी केली तेव्हा तिथे बरेच उलटसुलट माग होते. ते पोलिसांचे असणार
म्हणून मी तो विषय सोडून दिला. पण मी जेव्हा तबेल्याकडे जाणाऱ्या आळीत
पोचलो तेव्हा मात्र बर्फात उमटलेल्या खुणा एक मोठी कहाणीच सांगत होत्या.
गुंतागुंतीची आणि भलीथोरली.

तिथे एक बुटांचा माग होता. जाणारा
आणि येणारा. शिवाय आणखी एक माग होता. तोही जात आणि येत होता. पण हा दुसरा
माग अनवाणी पावलांचा होता. ही गोष्ट पाहिल्यावर मला आनंद झाला कारण
हाअनवाणी माणूस म्हणजे तुमचा पोरच असणार होता. बुटांचा माग येत-जात असला,
तरी अनवाणी पावले मात्र पळत गेली होती. शिवाय ठिकठिकाणी बुटाच्या ठशावर
पावलांचे  ठसे होते. याचा अर्थ सरळ होता की बूट घातलेल्या माणसाच्या मागून
अनवाणी पावलांनी तुमचा मुलगा धावला होता. पाठलाग करत. बुटांच्या ठशांचा
मागोवा घेत घेत मी तुमच्या हॉलच्या मोठ्या खिडकीपाशी येऊन पोचलो. तिथे बूट
घातलेला माणूस इतका वेळ बर्फात उभा राहिला होता की तिथले बर्फ विरघळून गेले
होते. मग पुन्हा एकदा मी त्या ठशांचा पाठलाग करत उलट दिशेला गेलो.
घरापासून साधारण शंभर यार्डांवर जाणारे बुटाचे पाय एकाएकी मागे वळले होते.  
तिथल्या बर्फात चिखलाची चांगलीच गिचमीड झाली होती. त्यावरून असे वाटत होते
की इथे काहीतरी मारामारी  झाली आहे. तिथून पुढे थोड्याच अंतरावर रक्ताचे
थेंब सांडलेले दिसत होते. ते पाहून या प्रकाराबद्दलचा माझा अंदाज बरोबर
असल्याची मला खात्रीच पटली. तिथून पुढे बुटातली पावले फक्त जाताना दिसत
होती आणि आणखी पुढे थोडे अंतर गेल्यावर रक्ताचे थेंब सांडल्याची आणखी एक
खूण होती. ती पाहिल्यावर बूट घातलेला माणूस जखमी झाला असला पाहिजे हे मी
ओळखले. तो माग तसाच हमरस्त्यापर्यंत गेला होता. हमरस्त्याला लागल्यावर
मात्र वाटेवरचे बर्फ झाडून टाकलेले होते आणि रस्ता स्वच्छ केलेला दिसत होता
त्यामुळे बुटांचे पुढे काय झाले हे काही सांगता आले नसते.

आत घरात आल्यावर हॉलच्या मोठ्या खिडकीची दारे आणि तिची लाकडी चौकट मी
माझ्या भिंगातून नीट तपासली. तेव्हा मला असे दिसले की तिथून कोणीतरी बाहेर
गेले होते. बाहेरून आत येणाऱ्या ओल्या पावलांचा एक ठसाही मला तिथे सापडला.
त्यानंतर काय घडले असेल हे हळूहळू माझ्या लक्षात यायला लागले. एक माणूस
खिडकीबाहेर वाट पाहत उभा होता. घरातल्या एका माणसाने त्याला मुगूट आणून
दिला. ही गोष्ट घडताना तुमच्या पोराने प्रत्यक्ष पाहिलीन. त्याने चोराचा
पाठलाग केला त्याच्याशी मारामारी केलीन. ते दोघेजण जोर लावून तो मुगूट ओढत
होते आणि त्या खेचाखेचीमध्ये दोघांच्या एकत्रित शक्तीचा परिणाम ओऊन तो
मुगूट मोडला. पण हे काम दोघांपैकी एकालाही एकट्याला करताच आले नसते. तुमचा
मुलगा चोराच्या हातातून मुगूट हिसकावून घेऊन आला आणि त्याचा मोडलेला तुकडा
चोरट्याच्या हातात तसाच राहिला. हे एवढे सगळे स्वच्छ दिसत होते. आता प्रश्न
असा होता की हा चोर कोण आणि त्याला मुगूट आणून देणारा त्याचा हस्तक कोण.

मी नेहमीच असे मानत आलेलो आहे, की हातात असलेल्या शक्यतांपैकी ज्या
घडू शकत नाहीत अशा गोष्टी वगळल्यानंतर, जे काही उरेल ते कितीही अशक्य
कोटीतले वाटले, तरीही तेच सत्य असते. तुम्ही स्वतःहून त्या चोराला मुगूट
आणून दिला नसतात हे मला ठाऊक होते. राहता राहिल्या तुमच्या मोलकरणी आणि
तुमची पुतणी. आता, जर तुमच्या मोलकरणींपैकी एखादीने घरात चोरी केली असती तर
तिला वाचवायला आपला बळी देण्याचे आर्थरला काय कारण होते? पण आर्थरचे
मेरीवर प्रेम होते. त्यामुळे तिच्या रक्षणासाठी आर्थर पुढे सरसावला हे
अगदीच पटण्याजोगे होते. शिवाय मेरीचे बिंग फुटले असते तर तिची छी थू झाली
असती त्यामुळे तर आर्थरचे तिला पाठीशी घालणे आणखीनच सयुक्तिक वाटत होते.
चोरी झाली त्या रात्री ती खिडकीजवळच उभी होती असे तुम्ही मला सांगितलेत आणि
हेही म्हणालात की त्या मुगुटाकडे पाहून ती बेशुद्ध पडली होती. या गोष्टी
लक्षात घेतल्यावर मला या बाबतीत नुसतीच शंका न राहता पक्की खात्रीच झाली.

मेरीला तुमच्याबद्दल विलक्षण कृतज्ञता आणि प्रेम वाटत असतानाही ज्याच्य्य्साठी
साक्षात तुम्हाला फसवायला ती तयार झाली असा हा माणूस कोण बरे असू शकेल?
निश्चितपणे तिचा प्रियकर असणार. तुमच्याबद्दल वाटत असलेल्या प्रेमापेक्षाही
जास्त प्रेम तिला फक्त तिच्या प्रियकराबद्दलच वाटू शकते. तुम्ही म्हणालात
की तुमचा जनसंपर्क फार मोठा नाही आणि तुम्हाला मित्रही अगदी मोजकेच आहेत.
पण तुमच्या मित्रमंडळात सर जॉर्ज बर्नवेलचा समावेश होता. तो स्त्रियांचा
कर्दनकाळ असल्याच्या कहाण्या मी यापूर्वी कैकवेळा ऐकल्या होत्या. याचा अर्थ
खिडकीबाहेर बूट घालून उभा असलेला माणूस बर्नवेलच होता. आणि मुगुटाचा तो
हरवलेला तुकडाही त्याच्याकडेच मिळाला असता. तुमच्या पोराने बर्नवेलला
मुद्देमालासहित पकडले असले, तरी आपल्या घराण्याची बेअब्रू होण्याच्या
भीतीने तो तोंड शिवून बसेल हे बर्नवेलला पुरेपूर माहीत होते. त्यामुळे आपल्याला काहीच धोका नाही अशी त्याने स्वतःची समजूत करून घेतली होती.

एवढा
उलगडा झाल्यावर मी पुढे काय केले असेल याचा अंदाज तुम्ही सहज बांधू शकाल.
काल दुपारी मी मवाल्याच्या वेषात बर्नवेलच्या घरी गेलो. थोड्या
प्रयत्नांनंतर मी त्याच्या घरगड्याची ओळख काढली. त्या गड्याकडून मला समजले
की त्याच्या धन्याच्या डोक्याला आधल्या दिवशी रात्रीच एक जखम झाली होती.
शेवटी बर्नवेलचे जुने बूट मी सहा शिलिंग देऊन विकत मिळवले. मग मी पुन्हा
एकदा तुमच्या घरापाशी येऊन बर्फातले ठसे त्याच बुटांचे असल्याची खात्री
करून घेतली. "

"तरीच, काल एक विचित्र कपडे घातलेला माणूस माझ्या घराभोवती  फिरताना दिसला मला... "

"अगदी
बरोबर! तो माणूस म्हणजे मीच होतो. मी ज्या माणसाच्या शोधात होतो तो मला
सापडला आहे याबद्दल खात्री झाल्यावर मी घरी परतलो आणि पुन्हा एकदा माझा
नेहमीचा, सभ्य माणसाचा वेष धारण केला. झाल्या प्रकाराचा गाजावाजा झाला असता
तर चारचौघांत तोंड दाखवायला तुम्हाला जागा उरली नसती त्यामुळे पोलिसांची
मदत घेता येणार नाही हे मला माहीत होते. पण यामध्ये ददडाखाली अडकलेत ते
तुमचे हात ही गोष्ट बर्नवेलसारख्या  अट्टल बदमाशापासून लपून राहणार नाही
हेही मला पक्के ठाऊक होते. त्यामुळे सगळ्या गोष्टींची हाताळणी काळजीपूर्वक
आणि नाजूकपणानेच केली पाहिजे हे मी ओळखले. मी जाऊन बर्नवेलला भेटलो. माझ्या
अपेक्षेप्रमाणेच, सुरुवातीला त्याने कानावर हात ठेवले. मग मी त्याला
घडलेल्या सगळ्या गोष्टी अगदी तपशीलवारपणे सांगितल्या. तेव्हा मात्र मला
गुंगारा द्यायच्या बेताने त्याने भिंतीवर लावून ठेवलेले शस्त्र खाली घेतले.
मला याचा अंदाज होताच. त्याने माझ्यावर वार करायच्या आत माझे पिस्तूल मी
त्याच्या कपाळावर लावले. त्याबरोबर तो एकदम सुतासारखा सरळ झाला. मी त्याला
त्याच्याजवळच्या खड्यांसाठी एकरकमी हजार पौंड देऊ केले. हे ऐकल्यावर मात्र
त्याला दुःख झालेले दिसले. तो म्हणाला, "मी तीनही खडे फक्त सहाशे पौंडांना
विकून बसलो! मीच माझा घात केला... "   हे प्रकरण पोलिसांपर्यंत जाणार नाही
या बोलीवर मी त्याच्याकडून सगळी माहिती काढून घेतली. शेवटी हजार पौंडांना
मी ते तीनही खडे विकत घेतले, तुमच्या मुलाकडे जाऊन सगळे आलबेल झाल्याची
बातमी सांगितली आणि एकदाचा घरी आलो. रात्री झोपायला मला दोन वाजले. एकूणात
कालचा दिवस फारच कष्टाचा आणि धकाधकीचा होता. "

"कालच्या दिवसामुळे इंग्लंड एका मोठ्या घोटाळ्यापासून वाचले
आहे! " असं म्हणून सावकारबुवा उठून उभे राहिले. "सर, मी तुमचे आभार कसे
मानू हेच मला कळत नाही. मी तुमची जी कीर्ती ऐकली होती त्यापेक्षाही तुम्ही
कितीतरी पटींनी थोर आहात! मी खरंच तुमचा अतिशय ऋणी आहे. आणि आता मात्र
जराही वेळ न घालवता मला माझ्या बाळाकडे गेलं पाहिजे. मी फारच वाईट वागलोय
त्याच्याशी. त्याची जाऊन आधी क्षमा मागतो. फक्त बिचाऱ्या मेरीसाठी वाईट
वाटतं मला. तिचा ठावठिकाणा अगदी तुम्हीसुद्धा सांगू शकणार नाही का? "

 "आपण
असे नक्की म्हणू शकतो की सध्या ती बर्नवेलबरोबरच असली पाहिजे. आणि तिच्या
कर्मांची फळे आज ना उद्या तिला चांगलीच भोगायला लागतील यात शंका नाही"
होम्स म्हणाला.

--अदिती
(पौष शु. ४ शके १९३३,
२८ डिसेंबर २०११ )