बासरीविषयी थोडेसे !

बासरी हे भगवान श्रीकृष्णाच्या हातात शोभलेलं एक लोभस वाद्य. कान्ह्याच्या बासरीचे सूर उमटावेत आणि गोपिकांनीच काय गाई-वासरांनीही देहभान विसरून जावं इतकी ह्या बासरीची किमया. अर्थात ती बासरीची किमया की कान्ह्याची हे सांगणं अवघडच. ह्या बासरीविषयी एक कथा वाचण्यात आली ती अशी की कृष्णाचं बासरीवरच सर्वात अधिक प्रेम आहे हे जाणून गोपिका बासरीवर चिडून असायच्या. एकदा त्यांनी बासरीला विचारलंच की आम्ही असताना कान्ह्याचं तुझ्यावर इतकं प्रेम कसं? तर बासरीने उत्तर दिलं की मला एकूण सात छिद्रं आहेत. त्यातल्या ६ छिद्रांतून षड्रिपू केव्हाच बाहेर गेलेले आहेत. सातवे छिद्र म्हणजेच बासरीचे मुखरंध्र, तिथून केवळ कान्ह्याने फुंकर मारली तरच आवाज येतो म्हणजे मला स्वतःचा आवाज नाही म्हणूनच मला अहंकारही नाहीच. म्हणूनच कान्ह्याला मी जास्त जवळची आहे. हे ऐकून गोपींचा अजूनच जळफळाट झाला. (त्या कथेत पुढे असेही लिहिले होते की म्हणूनच की काय, पण अजून एकही प्रसिद्ध स्त्री-बासरीवादक झाली नाही, पण या वाक्यात काही तथ्य नाही. आज अनेक स्त्रिया बासरीवादन करीत आहेत. उदा. सिक्किल सिस्टर्स- कर्नाटकी पद्धतीचं बासरीवादन, हरिप्रसाद चौरासियांच्या शिष्या- देबप्रिया आणि सुचिस्मिता इ. ) 
        गवळ्यांच्या हाती असलेलं एक 'लोकवाद्य' ते शास्त्रीय वाद्यसंगीताच्या मैफलीतलं वाद्य हा बासरीचा प्रवास रंजक आहे.
बासरीला शास्त्रीय वाद्यसंगीतात मानाचं स्थान मिळवून देण्याचं श्रेय अमूल्य ज्योती घोष, अर्थात पं. पन्नालाल घोष यांना जातं. पन्नालाल घोषांबद्दल काही कथा सांगितल्या जातात त्या अशा. पन्नाबाबू ८-९ वर्षांचे असताना त्यांना नदीच्या पात्रात एक बासरी मिळाली. आणि नंतर २ वर्षांनी त्यांना एक साधू भेटला. त्या साधूजवळ एक शंख होता आणि एक बासरी. साधूने पन्नाबाबूंना बासरी वाजवण्यास सांगितले. पन्नाबाबूंनी ती वाजवली. साधूने 'संगीतातूनच तुला मोक्ष मिळेल' असे सांगितले.
         पन्नाबाबूंच्या घरातच संगीताचं वातावरण होतं. वडील अक्षयकुमार घोष सितार वाजवीत. त्यांचे मामाही गवय्ये होते.
त्यामुळे संगीताबद्दलचं प्रेम लहानपणापासूनच त्यांच्या मनी उपजलं. पन्नाबाबू बंगालमधल्या मूकपटांत बासरी (पावा) वाजवायचे. एका समारंभात संगीत दिग्दर्शक अनिल विश्वास यांच्याशी ओळख होऊन ते अनिल विश्वास यांच्या वादकगटात सामील झाले. एकदा अनिल विश्वासांची एक रचना वाजवीत असता पन्नाबाबूंना खालच्या पट्टीच्या बासरीची निकड भासू लागली. अशी बासरी अस्तित्वात नव्हती. पन्नाबाबूंनी एका खेळणेवाल्याच्या मदतीने अशी मोठी आणि खालच्या पट्टीचे स्वर असलेली बासरी तयार करण्याचे प्रयत्न केले. तो खेळणीवाला बासरी तयार करण्यात वाकबगार होता. पन्नाबाबूंनी बासरीसाठी ब्रास, पितळ, स्टील, प्लास्टिक असे अनेक पदार्थ वापरून पाहिले. अनेक प्रयत्नांनंतर त्यांनी 'काळी२' चा षड्ज असलेली ३२ इंची बासरी तयार केली. बासरीच्या शेवटच्या ३ छिद्रांपैकी पहिली (मुखरंध्राकडून पहिली) २ छिद्रे बऱ्यापैकी एकमेकांच्या जवळ असली तरी शेवटचे छिद्र त्या दोन छिद्रांपासून बरेच लांब असते. ही छिद्रे अनुक्रमे तर्जनी, मध्यमा आणि अनामिकेने बंद केली जातात. ३२ इंची बासरीत तर हे अंतर फारच झालं (जवळपास २ इंच)
(इथे पाहा. चित्राच्या डाव्या बाजूला बासरीचे मुखरंध्र आहे आणि उजव्या बाजूच्या शेवटी ही तीन छिद्रे आहेत. )अनामिका ताणून हे शेवटचे छिद्र बंद करावे लागे. मुळात अशी इतकी मोठी बासरीच कुणी आधी पाहिली नसल्याने अशी अफवा पसरली की पन्नाबाबूंनी शस्त्रक्रिया करवून घेऊन मध्यमा आणि अनामिकेच्या मधले कातडे काढून टाकले. पण प्रत्यक्षात असे काहीच नव्हते. पन्नाबाबूंना सरावामुळे अनामिकेने ते शेवटचे छिद्र बंद करून बासरी वाजवणे शक्य होत होते.
         पन्नाबाबूंनी अजून एक प्रयोग केला, तो म्हणजे बासरीला सातवे छिद्र(मुखरंध्र धरून आठवे) पाडले. अनामिकेने बंद केल्या जाणाऱ्या शेवटच्या छिद्राच्याही अजून थोडे खाली पण वादकाच्या बाजूला असे हे छिद्र होते. यामुळे बासरी अजून लांब झाली आणि खालच्या शुद्ध मध्यमापर्यंतचे स्वर बासरीवर वाजवणे शक्य झाले. (मुखरंध्र सोडून ६ छिद्रे असणाऱ्या बासरीवर केवळ खालच्या पंचमापर्यंतचे स्वर वाजवता येतात. फुंकर मारण्याचा कोन बदलून खालच्या तीव्र मध्यमापर्यंतही जाता येते, पण तो स्वर जास्त वेळ टिकवून वाजवणे शक्य होत नाही. पन्नाबाबूंच्या ७ छिद्रे असलेल्या बासरीवर, फुंकर मारण्याचा कोन बदलून खालच्या गंधारापर्यंतचे स्वर वाजवणे शक्य होते. ) आणि मध्यम आणि पंचम यांच्यात मींड वाजवणे शक्य झाले, जे एरवी ६ छिद्रांच्या बासरीवर शक्य होत नाही. या सगळ्या प्रयोगांमुळे पन्नाबाबू जवळपास शास्त्रीय गायकाच्या बरोबरीने एखादा राग बासरीवर वाजवू शकत होते. ही परंपरा त्यांच्या जी. एस. सचदेव, रघुनाथ सेठ, विजय राघव राव, नित्यानंद हळदीपूर इत्यादी शिष्यांनीही अबाधित ठेवली आणि बासरीला शास्त्रीय वाद्यसंगीतात उत्तरोत्तर अधिक मान मिळत गेला.
           पन्नाबाबूंच्या परंपरेत, बासरीची छिद्रे बोटांच्या पहिल्या पेराने बंद करण्याची पद्धत आहे. (इथे पाहा)
याउलट, नंतरच्या काळात पं. हरिप्रसाद चौरासिया यांनी, बोटाच्या मधल्या पेराने बासरीची छिद्रे बंद करण्याची पद्धत शोधून काढली (शोधून काढली किंवा ती पद्धत पुन्हा वापरात आणली). (इथे पाहा) हरिप्रसाद चौरासिया हे ६ छिद्रे असलेली बासरी वाजवतात. अर्थात, त्यांच्या बासरीवादनात त्यामुळे काहीच कमतरता येत नाही. (पंचम आणि मध्यमातली मींड तेवढी येत नसेल). हरिप्रसाद चौरासियांची परंपरा त्यांचा पुतण्या राकेश चौरासिया आणि त्यांचे इतर शिष्य सुनील अवचट, रूपक कुलकर्णी, वर उल्लेखलेल्या देबप्रिया आणि सुचिस्मिता इ. तरुण शिष्य मंडळी समर्थपणे पुढे चालवीत आहेत. पन्नाबाबू आणि हरिप्रसाद चौरासिया यांच्या वादनाची शैली थोडी भिन्न असली तरीही 'सेनिया' घराण्याचीच. कारण पन्नाबाबूंच्या संगीतावर संस्कार आहेत ते बाबा अल्लाउद्दिन खॉंसाहेबांचे आणि त्यांची कन्या श्रीमती अन्नपूर्णा देवी या हरिप्रसाद चौरासियांच्या गुरू. असे ऐकिवात आहे की हरिप्रसाद चौरासिया प्रथम उजव्या हाताने बासरी वाजवीत (म्हणजेच, बासरीची खालची तीन छिद्रे उजव्या हाताच्या बोटांनी बंद करीत) पण अन्नपूर्णा देवींकडे शिकायला गेले असता, 'आधीचे सगळे विसरून या' असे त्यांनी सांगितले. आणि हरिप्रसाद चौरासियांनी काही दिवसांचा वेळ मागून घेतला व नंतर गेले ते डावखुऱ्या बासरीवादकासारखेच. पाटी पूर्ण कोरी करून.
       पं. पन्नालाल घोषांनी लोकप्रिय केलेल्या मोठ्या बासऱ्या तयार करणारे अनेक कारागीर आज भारतात आणि भारताबाहेरही आहेत. अचूक श्रुतीत वाजणारी (करेक्टली ट्यूंड) बासरी तयार करणे हे काम मोठे अवघड. बांबू नैसर्गिक उत्पादन असल्याने कुठलाही बांबू हा अगदी अचूक सरळ आणि सिलेंड्रिकल नसतो. त्यामुळे गणिती पद्धतीने आकडेमोड करून बासरीच्या इतर छिद्रांचे मुखरंध्रापासूनचे अंतर ठरवणे सहजसाध्य नसते. सध्याच्या बासरी तयार करणाऱ्या कारागिरांमध्ये मुंबईचे आनंद धोत्रे (श्री रामचंद्र धोत्रे यांचे सुपुत्र), श्री हर्षवर्धन, श्री सुभाष ठाकूर असे भारतीय तर 'जेफ व्हिटियर' सारखे अभारतीय लोक आघाडीवर आहेत. या प्रत्येकाच्या बासरीची विक्री करण्यासाठीच्या वेबसाईटससुद्धा उपलब्ध आहेत.

पं. पन्नालाल घोष आणि पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्या वादनाची लिंक देऊन हा लेख आटोपता घेतो.
पं. पन्नालाल घोष यांचा सुंदर यमन इथे ऐका.
पं. हरिप्रसाद चौरासियांचा भीमपलास रागाचा झाला इथे ऐका.

- चैतन्य दीक्षित.
(जालावर पूर्वप्रकाशित- प्रकाशन दिनांक ९ जाने २०१२)