घोडा आणि मी

दुपारी काम करता करता अचानक लाइट गेले. बराच वेळ खर्च करून मी टाईप केलेला सगळा डेटा पण बहुतेक उडला होता त्यामुळे खूप चीड चीड झाली. पण करणार काय ? आता लाइट येईपर्यंत गप्प बसण्याशिवाय पर्याय नसल्याने मी खुर्चीतच बसून राहिलो. तेवढ्यात जेसन (माझा सह कर्मचारी) आला. लाइट गेल्याने त्याचंही काम अडलं असावं बहुतेक. थोड्याफार इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या अन अचानक त्याने विचारले "टेल मी हाउ डिड यू गेट इनटू हॉर्स रायडिंग बिझनेस?" "एका अपघाताने ", मी म्हणालो. " काय ? अपघात !! म्हणजे ?? टेल मी एक्झॅक्टली" जेसन म्हणाला. बरं म्हणून मी सांगायला सुरुवात केली.
२००२ साल, रमणबाग शाळेच्या ८वी क आणि ड चा वर्ग सहलीसाठी महाबळेश्वरला गेला होता. मार्केट वगैरे मध्ये थोडेफार फिरून आम्ही सनसेट पॉईंट वर आलो होतो. शनिवार असल्याने पर्यटकांची गर्दी होतीच त्यात आमचीही भर पडल्याने तो पॉंईंट अगदीच गजबजून गेल्यासारखा दिसत होता. आता इथे काय काय करायचं आणि फिरता फिरता काय काय घ्यायचं याच्या शोधात असताना अचानक माझी तंद्री ओंकार अथणीनी तोडली. "चल ए घोड्यावर बसू". "ए हाड मी नाही बसणार घोड्यावर बिड्यावर, तूच बस. मी नुसता बरोबर येतो" असं म्हणून मी त्याच्याबरोबर गेलो.
त्याने एक देखणा काळा अबलख घोडा निवडून त्याच्यावर बसून फोटोसेशन करून घेतलं. एव्हाना वर्गातल्या बऱ्याच मुलांनी तिथे गर्दी केली होती. साल्याला आयतच क्राउड मिळालं. मग काय त्यांच्यासमोर त्यानं एक मोठी रपेट मारली आणि येऊन हवा करायला लागला. मला घाबरट म्हणत माझी चेष्टा करायला लागला. "ए तुला तो घाबरट म्हणाला राव आपण असतो न तुझ्या जागी तर नसत हा ऐकून घेतलं" वगैरे डायलॉग्ज वर्गातल्या पोरांनी लगेच सुरू केलेच. माझ्या अहंकाराला त्यांनी घातलेले हे घाव सहन न झाल्याने पुढचा मागचा विचार न करताच, " च्यायला तू काय लय भारी झाला का रे ? येवढं काय त्यात ? मीपण चालवीन घोडा" अस म्हणून मी घोड्यावर अगदी ऐटीत मांड टाकली". येवढं होईपर्यंत अचानक घोडेवाल्याच्या हातून निसटून माझा घोडा सुसाट धावायला लागला होता. माझी चांगलीच बोबडी वळली. क्षणात माझा अहंकार गळून अविचारीपणे आपण काय संकट ओढवून घेतलंय याची जाणीव मला झाली. आयुष्यात याआधी कधीही घोड्यावर न बसलेला मी आज पहिल्यांदाच तुफान वेगाने दौडणाऱ्या त्या उमद्या घोड्यावर जीव मुठीत धरून खोगिराला घट्ट धरून कसाबसा बसलो होतो. काही केल्या त्याचा वेग कमीच होत नव्हता. सगळे प्रयत्न करूनही काहीच उपयोग होईना. माझी तर भीतीनं रडायलाही सुरुवात झाली होती. आतापर्यंत मोठी गोल चक्कर मारून घोडा परत उलट्या दिशेनंही फिरला होता आणि आता तो फिरून सनसेट पॉंईंट कडे पळायला लागला. माझा पाठलाग करत घोडेवाल्यानं मला गाठला होता आणि, ओरडून ओरडून मला लगाम ओढ, लगाम ओढ सांगत होता. पण मी तर पुरता थिजलो होतो मला काहीच सुचत आणि समजत नव्हत. आणि माझा घोडातर अजूनही तितक्याच जोरात पळत होता. आता तर मला समोरची दरी, तिचा तुटका कठडा आणि माझ्यासमोर आ वासून उभा असलेला मृत्यू स्पष्ट दिसत होता. आता आपण नक्की मरणार अशी माझी खात्री झाली होती आणि नकळतपणे मी वाचवा वाचवा करून किंचाळायलाही लागलो होतो. परिस्थिती अचानकपणे खूपच गंभीर झाली होती. माझी फजिती बघून मला हसणारे सर्व जण आता हा मरतो की काय या विचारानं पुरते गार झाले होते. मला डिवचून घोड्यावर बसवणारा मुलगा तर माझ्यापेक्षाही जास्त घाबरला असावा. सगळे चांगलेच घाबरले होते पण मध्ये येऊन तो घोडा कोण अडवणार? त्या नादात आपल्यालाच काही झाला तर काय ? असा विचार करून सगळेच बघ्याची भूमिका चोखपणे निभावत होते. हतबल आणि भयभीत असा मी आता शेवटचा पर्याय म्हणून घोड्यावरून उडी मारायच्या बेतात असतानाच घोडा वेगाने दौडत कठड्याच्या थोडं अलीकडे उभ्या असलेल्या इतर घोड्यांजवळ येऊन थांबला आणि शांतपणे उभा राहिला. थोडा वेळ मला काय झालं हे समजलंच नाही. क्षणाचाही विलंब न करता मी खाली उतरलो आणि लांब पळालो. बस्स पुन्हा एकदा हळू हळू हशा पिकू लागला. बसमधून घरी येताना जवळपास सगळी पोरं मला चिडवून मोकळी झाली होती. माझी बेक्कार हटाई झाली होती. काय करणार माझीच मस्ती मला नडली होती. पण मनात एक गोष्ट पक्की केली, की आता या अपमानाचा बदला घ्यायचाच. आणि काही वर्षातच माझ्या ध्यानी मनी नसताना ती संधी स्वतःहूनच माझ्याकडे चालत आली. मी अश्वारोहण कसं शिकलो ही पण एक मोठी गोष्ट आहे तीही सांगीनच केव्हातरी पण आता मी स्वतः एका नावाजलेल्या प्रशिक्षण केंद्रात अश्वारोहणाचे प्रशिक्षण देतो हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक.
या अपघातानं माझ्या आयुष्याला एक वेगळंच वळण लावलं. ढोबळमार्ग सोडून नवी क्षितिजे गाठण्याची संधीच जणू मला मिळाली. करियरच्या बाबतीत अगदी सामान्य अशा माझ्या मतांना बदलून या नव्या आणि भरपूर संधी असलेल्या मार्गावर आणल्याबद्दल मी आयुष्यभर त्या अश्वराजाचा ऋणी राहीन.