स्वप्न मनीचे भंग पावते तू नसताना
रात्र मखमली आज काचते तू नसताना
मोर नाचण्या आला नाही आज अंगणी
श्रावणातही ऊन तापते तू नसताना
मलाच नाही निसर्गासही पिसे लागले
बारा महिने पतझड असते तू नसताना
हलक्या फुलक्या कुठे हरवल्या गजला सार्या?
लेखणीतुनी दु:ख झिरपते तू नसताना
प्रीत आपुली फुलली रात्री पुनवेच्या पण
तेच चांदणे मला पोळते तू नसताना
औषध तू अन् तूच बिमारी आज जाणले
तुज आठवता बरे वाटते तू नसताना
वीष प्यायचा गुन्हा जाहला काय करू मी?
जगात असणे नको वाटते तू नसताना
सांज सकाळी झिंगत असतो भान हरवुनी
मदिरा पीण्या कारण मिळते तू नसताना
झपाटल्यागत तुझे वागणे असे कसे रे?
"निशिकांता"ला वेड लागते तू नसताना
निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३