जीवना रे

           जीवना रे !

मी किती तडजोड केली जीवनारे?
का जगू मी वेळ गेली जीवनारे?

पत्करू शरणागती का अंत समयी?
आस जगण्याचीच मेली जीवनारे

भूक पोटी हास्य ओठी कसरतीची
खेळली दिनरात खेळी जीवनारे

कोरले दारिद्र्य भाळी, मी तरी पण
पाहतो स्वप्नी हवेली जीवनारे

ते जरी माझेच होते, वार त्यांचे
झेलले वेळी अवेळी जीवनारे

दुर्गुणांची वेल फुलली, ना दिसे का?
सदगुणी चंपा चमेली जीवनारे

आत्मवृत्तातील पाने ओलसर का?
आसवांनी भिजवलेली जीवनारे

दांडगे धनवान करती राज्य येथे
आम जनता का भुकेली जीवनारे?

बेगडी "निशिकांत" नाती सर्व फसवी
वेदना सख्खी सहेली जीवनारे

निशिकांत देशपांडे   मो.क्र.  ९८९०७ ९९०२३