झरून गेले

अश्रूचे धन तुला आठवित ठिबका ठिबका झरून गेले
कफल्लकाचा संग नकोसा दूर स्वप्नही निघून गेले

माफक आशा मनात माझ्या एक पसा आनंद मिळावा
मिणमिणत्या पणतीत उजळतो तारांगण जर विझून गेले

पंख पसरुनी नाचायाला सज्ज जाहले मोर परंतू
श्रावणातही वांझोटे नभ गडगड नुसती करून गेले

पहिले वहिले प्रेम विसरणे मला न जमले यत्न करूनी
मिठीत कोणी मनात कोणी असेच जगणे ठरून गेले

माळ घातली तुळशीची मी उजळायाला प्रतिमा माझी
काळवंडली तीच बिचारी पुण्य लढाई हरून गेले

निवडणुकांच्या नियंत्रणाला म्हणे सक्त आचार संहिता!
नको तेच ते करून नेते प्रशास्नाला हसून गेले

फुले वेचली देवपुजेला चोर मला का लोक म्हणाले?
काय तयांचे देशधनाला खुलेआम जे लुटून गेले?

पक्ष कोणता देइल मजला निवडणुकीची उमेदवारी?
पिता पितामह माझे स्वर्गी खरडेघाशी करून गेले

"निशिकांता"ला यक्षप्रश्न हा जगात आता कसे जगावे?
उजळ नांदते पाप इथे अन् पुण्य पोरके दडून गेले.

निशिकांत देशपांडे   मो.क्र.  ९८९०७ ९९०२३
E Mail---  nishides1944@yahoo.com