गजबजलेली मधुशाला अन् मंदिर का सुनसान असावे?
चंगळवादी जगणार्यांचे बसलेले बस्तान असावे
लग्नाविन एकत्र नांदणे आम जाहले स्त्री-पुरुषांचे
वासनेस ते प्रेम समजती हरवुन गेले भान असावे
ब्रह्मानंदी टाळी लागे कानी पडता सुरेल ताना
डीजे ऐकुन अता वाटते बहिरे माझे कान असावे
प्राप्त कधी का लैला होते फक्त इशारे करून वेड्या?
तिला वाटते सदा तिच्यावर कुणी तरी कुर्बान असावे
आत जिथे गडगंज संपदा अन् दारावर कैक भिकारी
कयास माझा बहुधा तेथे देवाचे संस्थान असावे
पार्टीमधली भेट आजची जेवण नुसते निमित्त आहे
सरकारी बाबूंचे येणे विकावया ईमान असावे
करून यात्रा हाजी झालो दगड मारले जमारातला*
आज विखुरले, पण त्या काळी फक्त तिथे सैतान असावे
फक्त सुपारी घेवुन कोणी खून कराया तयार नाही
खुन्यास वाटे सत्तावलयी मज मानाचे पान असावे
खंत मनाला "निशिकांता"च्या कुठे न दिसती अपुले सारे
मरण्या आधी माझ्या नावे करून गेले स्नान असावे
*मुस्लिम बांधव हज यात्रेच्या शेवटच्या दिवशी सैतानाला दगड मारतात; त्याला जमारात असे म्हणतात.
निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail;-- दुवा क्र. १