माळा

                    

खूप भोगले मान मरातब अन् सुमनांच्या माळा
उतरण आली अता घालतो रुद्राक्षांच्या माळा

घरास हल्ली अडगळ होते माझ्या असण्याची
गळ्यास विळखा घट्ट घालती नैराश्याच्या माळा

पाय रोवुनी जमिनीवरती वास्तववादी जगलो
भूक न भागे स्वप्नी बघुनी नक्षत्रांच्या माळा

साफल्यांची फुले वेचली, पण त्या पासुन
क्रूर जीवना का तू केल्या वैफल्यंच्या माळा?

जगदंबेची भक्ती माझी पोट जाळण्यासाठी
मिळे जोगवा गळा घातल्यावर कवड्यांच्या माळा

देश धनाला लुटून नेता, नेता बनला खासा
मीच मूर्ख का उगा ओवल्या आदर्शांच्या माळा

माळा फेकुन मनास वाटे माळावरती जावे
विरक्त व्हावे, पुरे घालणे सुखदु:खांच्या माळा

निशिकांत देशपांडे  मो.क्र.  ९८९०७ ९९०२३
E Mail:-  nishides1944@yahoo.com