पाहिजे..!

येउदे शिशिर कशास खंत पाहिजे
आपुल्या मनामधे वसंत पाहिजे

भेसळीशिवाय सौख्य जर हवे तुला
कनवटीस दु:ख मूर्तिमंत पाहिजे

आग जीवनासही क्षणात लागते
तेवढा विषय तुझा ज्वलंत पाहिजे

पाहतो उगाच का तुला पुन्हा पुन्हा
हृदय सांगते मला उसंत पाहिजे

जन्मठेप, शृंखला सुखावतीलही
सूर पण अनादि अन् अनंत पाहिजे

सागराकडून का तहान भागते
कातळातला झरा निरंत पाहिजे

आणशील स्वर्गही धरेवरी उद्या
बस तुझ्यातला कवी जिवंत पाहिजे

--  अभिजीत दाते