अनुत्तरीत राहिले ( तरही )

पसा भरून मोद अन् अमाप दु:ख का दिले?
कितीक प्रश्न का असे अनुत्तरीत राहिले?

अता सरावलोय दु:ख भोगण्यास एवढा
सुखाशिवाय हासण्यास मी मलाच शिकविले

प्रदर्शनात वेदना कधी न मांडल्या रड्या
सुरात दु:ख, मी तरी खुशीत गीत गाइले

नसेच देव या जगी हजार तर्क मी दिले
यदा कदा असेल तर? लपून फूल वाहिले

उशीर जाहला कळावया सुमार माणसे
महान वाटले तयास व्यर्थ काल पुजिले

पिलास दूर देश का चरावयास लागती
न माय आठवे जिने तयास घास भरविले

उशास वेदना तरी सुरेख झोप लागली
अमीर भोगतात त्या खुज्या सुखास हिणविले

प्रभूच करविता जगी  पुराण शास्त्र सांगती

कशास रावणाकडून पाप व्यर्थ करविले?

नकाब फाडताच, चेहरे किती भयाण ते!
प्रतिष्ठितात खूप हिंस्त्र श्वापदांस पाहिले

निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३