६१. ग्रेस

मी महाकवी दु:खाचा
प्राचीन नदीपरि खोल
दगडाचे माझ्या हाती
वेगाने होते फूल

स्वत:च्या संपूर्ण मालकीची आणि केवळ स्वत:ची अशी अत्यंत सुंदर भाषा, लयकारीचा जीवघेणा नखरा आणि प्रतिमांची गूढ आणि नितांत रम्य मांडणी म्हणजे ग्रेस.

ग्रेसनी कवितेला दिलेल्या योगदानाप्रती अत्यंत हार्दिक कृतज्ञता व्यक्त करून; सृजनाची प्रक्रिया, सृजनातली दुर्बोधता आणि ग्रेसच्या कवितेतून आपण काय घेऊ शकतो हे विशद करणारा हा लेख सादर करतो.

______________________________

सृजनाची संपूर्ण प्रक्रिया अशीये:

हिज इनिशीयल चॉइस ऍट द बिगिनींग ऑफ अ वर्क ऑफ आर्ट इज थिऑरिटिकली कंप्लीटली ओपन. ही इंपोजेस ऑन हिमसेल्फ अ हायली रेसट्रिक्टेड फॉर्म

एनी फॉर्म विल डू सो लाँग ऍज इट कंटेन्स द पोटेंशिअल फॉर अ कॉंप्लेक्स सेट ऑफ वेरीएशन्स.

द क्वालिटी ऑफ ब्यूटी विल डिपेंड ऑन हाऊ ही मॅनेजेस तू अवॉइड द मोस्ट ऑबवियस अँड क्लम्झी ऑफ पॉसिबल वेरीएशन्स अँड हाऊ ही कंट्राइव्ज टू मेक डेअरींग, सटल, अम्युझिंग ऑर सप्रायझींग वेरीएशन्स ऑफ द थीम विदाउट ऍक्शुअली डिस्ट्रॉइंग इट.

(आपण मूळात निराकार असल्यानं, कोणत्याही अभिव्यक्तीपूर्वी) अभिव्यक्तीच्या असंख्य संभावना आपल्याला उपलब्ध आहेत पण अभिव्यक्त होण्यासाठी आकृतिबंधाची गरज आहे.

हा आकृतिबंध कोणताही असू शकेल (कविता, लेखन, चित्रकला, नृत्य, गाणं, नाटक, सिनेमा किंवा वक्तृत्व) फक्त त्या आकृतिबंधात अभिव्यक्तीच्या अनेकानेक संभावना हव्यात. इट इज ऑल्सो द अदर वे, अभिव्यक्तीचा आकृतिबंध निश्चित झाल्यावर, स्वीकारलेल्या विषयात अभिव्यक्तीच्या अनेकानेक संभावना हव्यात, म्हणजे कलाकारानं गायन हा अभिव्यक्तीचा फॉर्म स्वीकारला तर त्याला यमन सारखा (किंवा तत्सम) अभिव्यक्तीच्या अनेक संभावना असणारा रागविषय निवडायला हवा.

आविष्काराचं सौंदर्य कलाकार मग, सरधोपट आणि कंटाळवाणी वेरीएशन्स चुकवत; साहसी, तरल, मोहक आणि उत्कंठापूर्ण वेरीएशन्स कशी करतो आणि ती करताना स्वीकारलेल्या फॉर्मशी इमान कसं राखतो यावर अवलंबून असतं.

_______________________________________

ग्रेसची कविता दुर्बोध होण्यामागे कारण असंय की त्याची कविता शब्दसौंदर्य आणि लयकारीशी नि:संशय इमान राखते पण तिच्या सर्व वेरीएशन्सचा मध्यवर्ती काव्यविषयाशी एकसंध संबंध राहत नाही.

म्हणजे यमन सुरू केल्यावर सर्व वेरीएशन्स यमन मधलीच हवीत; ताल आणि लय तीच ठेवून तुम्ही इतर रागातली वेरीएशन्स निदान तो राग संपेपर्यंत तरी घेऊ शकत नाही आणि तसं कुणी गायलं तर ते गाणं सौंदर्यपूर्ण असेल पण ऐकणाऱ्याला दुर्बोध होईल तसं ग्रेसच्या कवितेचं झालंय.  

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते

इथपर्यंत ग्रेस आपल्या बरोबर असतो,

हे झरे चंद्र सजणाचे, ही धरती भगवी माया,
झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया

इथे त्याची प्रतिभा, रूपकं, त्यानं निर्माण केलेल्या प्रतिमा आणि त्याच्या जाणीवेची संवेदनाशीलता आपल्याला थक्क करते, पण

गात्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे

इथे ‘तिच्या स्मरणाचं चांदणं’ आणि ‘गात्रात गुणगुणणारं दु:ख’ यांचा मेळ मोठ्या मुश्किलीनं मानावा लागतो पण तिथून पुढे ग्रेस अनाकलनीय होत जातो.

संध्येतील कमल फुलासम, मी नटलो शृंगाराने
देहाच्या भवति रिंगण, घालती निळाईत राने

किंवा

त्या वेळा नाजूक भोळ्या, वाऱ्याला हसवून पळती
क्षितिजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती

आणि

ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदूतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरूंची राई

इथे येईपर्यंत ग्रेसचा हात आपल्या हातातून पूर्णपणे सुटलेला असतो.

कवी उत्तराला बांधील नाही पण विषयाला आहे आणि ग्रेसला ते मान्य नाही.

दारी उभा गे साजण
नको त्याच्या पुढे जाऊ
त्याने यात्रेत भेटल्या
कुण्या पोरीच्या देहाला
दिले आभाळाचे बाहू

हे आपण समजू शकतो, पण पुढे

हात नाहीत गं त्याला
उभा अंधारी साजण
तिने जीव दिला तरी
त्याने वाहत्या पाण्याचे
इथे आणले पैंजण

हा ग्रेसचा अत्यंत व्यक्तीगत अनुभव आहे पण ग्रेस त्याचं स्पष्टीकरण देईल तर तो लेख होईल आणि रसिकाला तो अनुभव काय आहे याची कल्पना नसल्यानं मग ग्रेस दुर्बोध होतो

ती गेली तेव्हा रिमझीम पाऊस निनादत होता
मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवीत होता

या मांडणीला तुम्ही बेदखल करू शकत नाही, जरी पुढच्या प्रत्येक कडव्याची दुसरी ओळ कळली नाही तरी पहिली ओळ वेड लावतेच

ती आई होती म्हणूनी घनव्याकूळ मीही रडलो
त्या वेळी वारा सावध पाचोळा उडवीत होता

अंगणात गमले मजला संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता

काय असेल कारण या दुर्बोधतेचं? तर ग्रेसची ‘ती’ नक्की कोण याचा शेवटापर्यंत उलगडा होत नाही. कवितेनं प्रश्न सोडवायला हवे (किंवा उत्तर द्यायला हवं) असं नाही पण अभिव्यक्तीचा निर्देश सतत काव्याच्या मूळ विषयाशी हवा हे ग्रेसला मंजूर नाही म्हणून ग्रेसची कविता वाचून रसिकाला एका विषयाचा एकसंध अनुभव येत नाही.

दुसरं कारण असंय की ग्रेसचं मूळ काव्यविषयाशी जेव्हा सतत तादात्म्य असतं (राजपुत्र आणि डार्लिंग) तेव्हा ते अनुभव इतके व्यक्तीगत असतात की रसिकाला लयीचं आणि शब्दांचं सौंदर्य शेवटापर्यंत मोहवत राहतं पण तो त्या अनुभवाशी रिलेट होऊ शकत नाही आणि परिणामी ग्रेस दुर्बोध होतो.

ग्रेसच्या दुर्बोधतेचं कारण कळल्यावर आपण ग्रेसकडून काय घ्यायचं ते पाहू.
_______________________________  

ग्रेसची कविता कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नाही किंवा कोणत्याही एका मूडची ती सलग मांडणी नाही आणि जर असलीच तर तिच्यात त्याचे अत्यंत व्यक्तीगत अनुभव आहेत त्यामुळे तुम्हाला त्याच्या कवितेचा आनंद घ्यायचा असेल तर कवितेची दुर्बोधता मंजूर करावी लागेल.

एकदा ही दुर्बोधता मंजूर केल्यावर ग्रेसची सौदर्यदृष्टी, त्याच्या शब्दांची आणि रूपकांची मोहवणारी दुनिया, त्यांची नादमयता, त्याचं लयीवरचं अफलातून प्रभुत्व, त्याच्या जाणीवेची तरलता आणि कवितेचा गूढ माहौल तुम्हाला थक्क करेल. त्याची कविता तुमच्या अंर्तमनात लपलेल्या कवितेला जागं करेल आणि तीच ग्रेसची खरी जादू आहे.

एम एफ हुसेन वादग्रस्त आहे पण त्याच्या रेषेत जबरदस्त रिदम आहे, त्याच्या मांडणीत कमालीचा तोल आहे, रंगात जादू आहे आणि या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून एक रम्य गूढता आहे, ग्रेसच्या कवितेचं अगदी तसंच आहे.

एम एफचं व्यक्तीगत जीवन कसंही असो त्याचा काहीही संबंध मध्ये न आणता त्या चित्रातनं, आपण आपल्याला असलेलं रंग, रेषा, आकार, मांडणी, सहजता आणि गूढत्व यांचं आकर्षण जागवू शकतो. अगदी तसंच ग्रेस कितीही दुर्बोध असला तरी त्याच्या कवितेशी बेशर्त एकरूप होऊन आपण शब्द, त्यांची नादमयता, लयकारी, सौदर्यदृष्टी, जाणीवेची तरलता आणि त्यातून निर्माण होणारी रम्य गूढता आपल्या अभिव्यक्तीत आणू शकतो आणि ती ग्रेसला खरी श्रद्धांजली आहे.  

संजय

   मेल :   दुवा क्र. १