वैशाख वणवा

वैशाख वणवा
पेटला नभात
रानात, भुईत
काहिली अंगात

कोरड्या रानात
कोळपली पात
जाळतो भास्कर
फुफाटे धुळीत

चैत्राची पालवी
डोलते भरात
पळस पांगारा
फुलतो रानात

येतसे भरात
वैशाख मिरास
कोवळ्या पानांची
नाजुक आरास

जागोजाग तुरे
फुलती रुखात
रंगीन वैशाख
खुलतो तोर्‍यात

मधुर गंधाचा
मोगरा भरात
रातीची नक्षत्रं
फुलती वेलीत

ओलावा मातीचा
हिरावून नेत
जागोजाग भेगा
भुईच्या उरात

दिवसा जाळोनी
थकतो वैशाख
घेऊन निद्रिस्त
गारवा कुशीत

दूर त्या रानात
आभाळा बघत
आशा पावसाच्या
कोरड्या डोळ्यात .......