स्वप्नांचे..!

भेटीला ये नकोच देऊ कारण स्वप्नांचे
उगाच होते सत्याशी मग भांडण स्वप्नांचे

नशेमध्ये असतानाही मी बरळलोच नाही
कल्पनेस बहुतेक असावे कुंपण स्वप्नांचे

हलक्याफुलक्या स्वप्नांचा तो काळ कुठे गेला
ओझे का वाटावे आता मण मण स्वप्नांचे

चटई निर्देशांक तयांच्या आयुष्याला द्या
तुमच्यासाठी तुटले ज्यांचे अंगण स्वप्नांचे

मेल्यानंतर हाल न झाले असते आत्म्यांचे
जर का करता आले असते तर्पण स्वप्नांचे

माझ्यासाठी उल्का कुठली निखळलीच नाही
रिते तरीही पहाटेस तारांगण स्वप्नांचे

--  अभिजीत दाते