भारतभेट २०१२

 

यंदाची भारतभेट काही वेगळीच होती. आंबे खायला मिळणार होते. तब्बल ११
वर्षानंतर हापूस व पायरी खायला मिळणार याचा आनंद होता. ठरवले होते
आंब्याचे प्रत्येक रूप कॅमेरात साठवून घ्यायचे. देवगडाचे हापूस आईच्या घरी
घरपोच येतात. तिच्या जावयांचे मित्र यांच्या ओळखीतून येतात शिवाय
बाबांच्या मित्रपरिवारात नवीन ओळखीतूनही येतात. आमच्या लहानपणी पुण्यात आई
मंडईतून हापूसच्या पेट्या व पायरीच्या करंड्या आणायची. त्यावेळी ५ ते ६
डझनांची पेटी ३५ रूपयांमध्ये येत होती. ही पेटी रिक्शात घालून देण्याकरता
मंडईत काही बायका येजा करण्याकरता होत्या. त्यावेळी ही पेटी वाहून
नेण्याकरता त्या रुपये २ घेत असत. सासर मंडई जवळच असल्याने जेव्हा
डोंबिवलीवरून आम्ही दोघे येत असू तेव्हा सासरे हवे तसे आणि हवे  तितके आंबे
मंडईतून आणत असत. हापूस आंब्याच्या लाकडाच्या पेट्या व पायरीच्या सुबक
करंड्या हे चित्र आता भूतकाळातलेच!   

मे
महिन्यातली ही भारत भेट पहिलीच होती. दरवर्षी जानेवारीत जाणे होत होते.
फोनवरून आईला मे महिन्यातल्या खास पदार्थांची यादी सांगत होतेच. शिवाय
मनात एकीकडे कोणकोणते फोटो घ्यायचे याची यादीही तयार होत होती. ठरवलेल्या
यादीतले बरेचसे फोटो काढले गेले. ऐन मे महिन्यात भारतभेटीस जात आहोत तर
उन्हाळ्याचा त्रासही सोसावा लागणार याची मानसिक तयारीही केली होती पण खूप
त्रास सहन करावा लागला नाही. आंब्याबरोबरच कैरीचे सर्व प्रकार आईने आधीच
करून ठेवले होते. कैरीचे तिखट व फेसून मोहरीचे गोड लोणचे, मेथांबा,
साखरेचे व गुळाचे पन्हे, कैरीची चटणी! यावर्षी जिभेचे चोचले चांगलेच
पुरवले गेले! गव्हाचा गरम गरम चीक, सोलपापड्या व पोह्याचे तिखट डांगर
अनेक वर्षानंतर खाल्ले! आईकडे सोलपापड्यांचे दोन तीन स्टँड आहेत. ते
स्टँड बाहेर काढून ठेवण्यासाठी कॉटेखालची जागा उघडली. पूर्वी सिटीच्या
खाली पांघरुणे व इतर भांडी ठेवण्यासाठी कप्पे असत. हे कप्पे उघडले तर
त्यात २ ते ३ नवीन जोडप्यांचा नवीन संसार नक्कीच बसेल इतकी भांडीकुंडी
आईकडे आहेत! चिनीमातीच्या पांढऱ्या स्वच्छ कपबश्या, बाऊल, व खोलगट
डिशाही आहेत. त्यावर नाजूक नक्षीकाम केलेले तर खूपच उठून दिसते. हे सर्व
सेट आईने पूर्वी बोहारणीला जुने कपडे देऊन घेतलेले आहेत. आईकडे आलागेला
असल्याने या सर्वाचा उपयोग अजूनही होतो!

या
भारतभेटीमध्ये अजून एक आकर्षक गोष्ट होती ती म्हणजे रेडिओ ऐकण्याची.
माझ्या मामेबहिणीने मामाच्या आठवणीप्रीत्यर्थ आईला रेडिओ दिला होता. मुख्य
म्हणजे रेडिओवर गाणी अजूनही जुनीच लागलात त्यामुळे रेडिओ ऐकण्यात जास्त
मजा होती. साडेआठला जेवणे उरकून रेडिओ लावून बसायचो ते छायागीत व बेलाके
फूल ऐकूनच रेडिओ बंद करायचो. दिवसभरातली गाणी वेगळी चालू असायचीच. रेडिओ
बंद करून नंतरचा कार्यक्रम म्हणजे डास मारणे हा होता. मुठा नदीवर एक रस्ता
करण्यासाठी नदीच्या बाजूची घाण उपसत आहेत त्यामुळे पुण्यात खूप डास झाले
आहेत. इतके की ते कशालाही बळी पडत नाही. गुडनाईट लावा किंवा ओडोमास लावा.
शेवटचा उपाय म्हणजे डास मारण्याचे एक रॅकेट निघाले आहे. त्याने फटाके
वाजावेत असे डास मारले जातात. काही वेळा डास मारला जातो पण त्याचा आवाज
होत नाही मग लगेच हे काय आवाज क्यू नही आ रही है! असे डायलॉग. आईकडे
माझ्या भाचीची मैत्रीण काही दिवसांकरता राहायला होती. ती तेलगू आहे. ती
शिक्षणाकरता काही वर्षे पुण्यात आहे व नागपूरला आईवडील राहतात त्यामुळे
तिला मराठी बोललेले समजते पण बोलता येत नाही आणि आईला हिंदी बोललेले समजते
पण बोलता येत नाही. ती आईला हिंदीतून काही सांगते तर तिचे उत्तर म्हणून आई
मराठीतून बोलते. आई तिला काही मराठीतून सांगते तर त्याचे उत्तर ती
हिंदीमधून देते. अजून काही दिवस जर का ती राहिली असती तर आई हिंदी व ती
मराठीत बोलायला लागल्या असत्या!

तुळशीबागेतली
माझी व आईची नेहमीप्रमाणे एक चक्कर झाली. या वेळेला सुर्वे, देसाई बंधू
यांच्याकडून आंबे घेतले. नेहमीप्रमाणेच    शनिपारच्या रसवंती गुऱ्हाळात
जाऊन रस प्यायला. चितळ्यांकडून बाकरवडी, आंबाबर्फी, माहीम हालवा व
सुरतफेणी घेतली. चितळ्यांच्या दुकानात काउंटरवर जी कॅशियर होती ती भलतीच
उद्धट होती! वयस्कर बाईमाणसांकडून बिलाचे पैसे देताना थोडाफार उशीर लागतो.
गोष्टी पटकन सुधारत नाहीत पण ही बया "लवकर पैसे द्या" मागे खूप लाइन आहे
अशा चिडक्या स्वरात बोलत होती. मी आईला सांगितले आपण थोडे बाजूला होऊ. तू
पैसे द्यायची घाई करू नकोस. कॅशिअरला सांगितले मागच्या माणसांकडून बिले
द्यायला व पैसे घ्यायला सुरवात करा. आमचे बिल आमच्याकडेच आहे. पैसे
मिळतील. थोडा धीर धरा. पैसे द्यायला काही मिनिटे पण गेली नाहीत तर त्या
कॅशियरची ही बडबड! मनामध्ये नकळत अमेरिका भारत तुलना केली गेली. इथेही
कॅशिअरकडे लाइन असते.   वॉल मार्ट मध्ये तर कॅशियर बायका खूप थकलेल्या
असतात पण त्याचा राग त्या कोणावर काढत नाहीत. इथल्या कॅशिअर बायका तर ८ ते
१० तास उभ्या असतात! मला स्वतःला चितळे बंधू मिठाईवाले याबद्दल अजिबात
क्रेझ नाहीये. माहीम हालवा व सुतरफेणीची आठवण मला अचानक खूप वर्षांनी 
झाली व खावेसे वाटले म्हणून चितळ्यांच्या दुकानात गेलो होतो. यावर्षी
ग्रीन बेकरीतले छोटे समोसे घ्यायचे राहून गेले.

विनायकच्या
मित्रांकडे गेलो तेव्हा त्यांनी आवर्जून भारतीय भाज्या केल्या. कारले रस
भाजी, डाळ मेथीची पातळ भाजी, गवारीची रस भाजी, तोंडल्याच्या काचऱ्या,
दुधी. आईकडे घरच्या अळूची भाजी व अळूवड्या, लाल माठाची कांदा घालून
परतलेली भाजी तर कित्येक वर्षानंतर खाल्ली.     कुल्फी, आयस्क्रीम,
मसाला पान असे वेगळे पदार्थही काही मित्रांनी खायला घातले. आईच्या एका
मैत्रिणीने गरम थालीपीठ खायला दिले. त्या आईच्या मैत्रिणीचे व आईचे
एकमेकींना पदार्थ देणे सतत चालू असते. इथे अशी देवाण घेवाण नाही. या
आधीच्या शहरात राहायला होतो तेव्हा माझ्या काही मैत्रिणींचे पदार्थ देवाण
घेवाण होत असे. एकदा आईकडे भात उरला होता तर एकदा पोळी तर लगेच फोडणीची
पोळी व भात करून खाल्ला. त्याबरोबर आईने लगेच पोह्याचा पापडही भाजला.
यावर्षी खाण्यापिण्याची रेलचेल म्हणजे काय विचारता! आमरसाचे तर रतीब चालू
होते.       

आईकडे दुपारच्या निवांत वेळी काही ना काही धुंडाळत
असायचे म्हणजे कपाटात व कपाटाच्या  ड्रॉवर   मध्ये काय ठेवले आहे. तिथे
काही जुन्या वस्तू दिसल्या. आईची शिवणकामाची मोठी कात्री, रंगीबेरंगी
रिळे, स्ट्राइकर, खूप जुन्या कॅसेट. त्यात एक हिताची कंपनीची कॅसेट
दिसली. जाई काजळ दिसले. काही काचेच्या खूप जुन्या बांगड्या दिसल्या.
काही कृष्ण धवल फोटोज दिसले. त्यात गरवारे शाळेमधला एक ग्रुप फोटोही
पाहायला मिळाला आणि त्यातच हरवून गेले. आरामखुर्चीवर बसून घेतले. बाबांना
विचारले अजून मिळते का हो आरामखुर्ची बाजारात? तर म्हणाले मिळते.
पुढच्या वर्षी भारतभेटीमध्ये आमच्या डोंबिवलीच्या घरात आरामखुर्ची व रेडिओ
घेणार आहे असे आता तरी ठरवले आहे. यावर्षी आईबाबांकडे असलेली मराठी
पुस्तके आणली. दरवर्षी थोडी थोडी करत मराठी पुस्तके आणायची असे ठरवले आहे.

आईबाबांच्या घराच्या बाल्कनीत जी फुलझाडे लावली
आहेत त्यांचे फोटोज तर मी दरवर्षीच्या भारतभेटीमध्ये घेतेच घेते! यावर्षी
शेवंतीबरोबर मोगराही खूप छान फुलला होता. कुंड्यांमध्ये पक्ष्यांना
पिण्याचे पाणी व पोळीचे तुकडे वाडग्यांमध्ये असतात त्यामुळे बरेच पक्षी
पाहायला मिळाले. साळुंक्या, कबुतरे, कावळे व बुलबुल पक्षीही येतात. या
सर्व पक्ष्यांची दिवसभर मौजमजा सुरू असते. बरेच जण बाल्कनीत या सर्व
पक्ष्यांना खायला ठेवतात.   मला गुलमोहोर प्रचंड आवडतो तर त्याचाही फोटो
आठवणीने घेतला.    

यावर्षीचा आणखी एक वेगळेपणा म्हणजे
फेसबुकवर जुन्या मैत्रिणींची ओळख खूप वर्षांनी नव्यानेच झाली त्यांची
प्रत्यक्षात भेट झाली. त्या दोघी मला आईकडे भेटायला आल्या होत्या.
त्यांच्याबरोबर शाळा कॉलेजच्या गप्पा मारताना खूप आनंद होत होता. त्यात
एका मैत्रिणीबरोबर बोगनवेलीच्या खाली आमच्या दोघींचा एक फोटो तिच्या मुलाने
काढला. हा फोटो तर कायम स्मरणात राहील. दुसऱ्या मैत्रिणीने नाजूक भरतकाम
केलेले काही रुमाल भेट म्हणून दिले. ते रूमाल ज्या बटव्यात घातले होते तो
बटवा तर खूपच गोड आहे.    

काही गोष्टी आधी
ठरवूनही झाल्या नाहीत तर काही गोष्टी न ठरवताही चांगल्या रितीने पार
पडल्या. काही कारणास्तव काही मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी राहून गेल्या
त्याची भरपाई पुढच्या भारतभेटीमध्ये! काही गोष्टी इतक्या काही छान घडल्या
की त्याचा आनंद मनात कायमचा साठून राहिला आहे. बाकी विमानप्रवासात जर्मनी
थांब्यामध्ये बराच वेळ गेट उघडले नव्हते त्यामुळे बाहेरच्या परिसरात ताठकळत
बसायला लागले. सुरक्षा तपासणी दोन वेळा केली गेली.   लुफ्तांझा विमानात
जेवणही चांगले नव्हते. खिडकीजवळ जागा असल्याने काही फोटो छान मिळाले.
ढगांच्या समुद्रावर सूर्याची कोवळी किरणे छान दिसत होती तर एके ठिकाणी
ढगांचे डोंगर झाले होते.   झोपेचे उलटे सुलटे झालेले तंत्र लवकर मार्गी
लागले.

परतीच्या प्रवासात   मुंबई विमानतळावर आलो तर गर्दी
पाहून जीव कोंडला गेला. घामाच्या नुसत्या धारा नाहीत तर चक्क घामाची
अंघोळ! तसेही पुण्यातून रस्त्याने चालताना किंवा रिक्शातूनही जाताना गर्दी
पाहून जीव घुसमटतो. मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक यांच्याशी बोलून डोके
भणभणायला लागते. असे वाटते की बोलण्यातून व गर्दीतून जाताना किती प्रमाणात
ताकद निघून जाते अर्थात असे वाटणे हे फक्त परदेशात बरेच दिवस राहिल्याने
होते. तिथे राहत असताना या गर्दीतून वाट काढतच किती चालायचो. बोलायचो
हसायचो. किती चपळ होतो त्या वेळेस हे वाटल्याशिवाय राहवत नाही. बऱ्याच
कामांकरता जिन्यातून ये जा व्हायची तेव्हा दम लागायचा नाही. घरातून खाली
उतरल्यावर रिक्षा व बसच्या व आगगाडीच्या वाहत्या गर्दीतून किती तरी वेळा
येजा करत होतो. पण या सर्व गोष्टी आता खूप त्रासदायक वाटतात. खरे तर
इथेही मॉल मध्ये किंवा ग्रोसरी करताना खूप चालावे लागतेच पण तरीही तितके
दमायला होत नाही. रिक्शांतून जाताना तर अगदी दर क्षणाला वाटत असते आता हा
रिक्षावाला नक्कीच कुणाला तरी ठोकर देणार! परदेशातील स्मशान शांतता व
भारतातील गर्दी गडबड याचा विरोधाभास खूप प्रमाणात जाणवायला लागला आहे.
परदेशात राहून इथल्या सवयीचे गुलाम झालो आहोत! भारतात गेलो की वाटते परदेश
चांगला आणि इथे परत आलो की नको रे बाबा ही शांतता, हे जाणवते.

इथले
दैनंदिन जीवन परत नव्याने सुरळीत होत असतानाच पुढच्या वर्षीचे भारतभेटीचे
मनसुबे रचायला सुरवात झालेली आहे ते प्रत्यक्षात कसे उतरतात हे पुढच्या
भारतभेटीच्या प्रवासात!!!