यु कॅनडू (इट) !!

तू कॅनडा ला जाणार आहेस.... ( हो!!  माझ्या तोंडून अनवधानाने लगेच उद्गार बाहेर पडला.... )

विचारत नाहीये मी, सांगतोय.... उद्या मेल मिळेल तुला, Follow the instructions आणि लवकरात लवकर सगळी डॉक्युमेंट्स Ready Thev..... you have just 3 days !!  इति. आमचा बॉस !

ह्याला म्हणतात Dynamic Industry  !!   आज ची बात... उद्या चा भरवसा नाही.... करणार काय -... "कशासाठी -- पोटासाठी -- खंडाळ्याच्या -- घाटासाठी " च्या तालावर आम्ही तयारी करायला सज्ज झालो.... !!

अगदी काल.... कालच, पुण्यातून पालख्या उठल्या आणि आम्ही (पेपर मधल्या फोटो चे) दर्शन घेऊन तृप्त झालो... गेल्या काही दिवसांत पालखीसाठी येणाऱ्यांचा ओघ कमी झालेला अगदी स्पष्ट दिसत होता... पालखी सोहळ्यात कसे ३ भागात हरिजनांचे वर्गीकरण होते की नाही, हौशे, नौशे , गौशे... तसंच फॉरेन ट्रीप चे पण !

हौशे - म्हणजे हौसेने येणारे (उगीच परदेशवाऱ्या करत सुटायचं... पैसे जास्त असतात हो.. दुसरं काय !)

नौशे -  म्हणजे नवस फेडण्यासाठी येणारे (इथे नवस बोलल्यामुळे आलेले की अपत्याला नोकरी लागू दे परदेशी मग मी अमुक तमुक करेन... आणि मग ते अपत्य परदेशी येतं !!)

गौशे - ह्यांना कशात काही नसत... फक्त आपल्याला काही 'घावतय' का.... एवढा एकच विचार... मग काडेपेटी असो वा इतर काही.... (आता फॉरेन ट्रीप च्या बाबतीत मी कदाचित ह्या पंथात येतो... ! कारण कामं झालं की, लोकं नायगरा, आयफेल टॉवर, पिसा चा मनोरा, वगैरे ला जाण्याचे बेत आखत असले तरी इथे येऊनही मला मात्र मी घरी काय नेणार हाच  प्रश्न पडतो... )

 माझे ३-४ मित्र आणि माझी एक मैत्रीण म्हणाली -- >" कसा रे तू असा ? अगदीच व्यवहारी आणि बिनासौंदर्यदृष्टीचा ? " लोकं खास तिकिटे काढून जातात... तुला चान्स मिळाला आहे एवढा, राहा-खायचा खर्च कंपनी करणार तर मग तू का एवढा कंजूसपणा करतोस.... थोडा खर्च करावा माणसाने स्वतःवर ! " --->

खरंच की ? अशी संधी पुन्हा मिळेल की नाही ह्याची गॅरेंटी नाही, आणि स्वतः कमावत आहोत तर स्वतःवर खर्च करण्यासाठी काय हरकत आहे ना ? थोडं सौंदर्यवादी झालो तर बिघडलं कुठे ?

 सौंदर्यप्रेमी नाही, मूर्ख आहेस तू... एकवेळ तू स्वतः हा विचार केला असतास तर ठीक होते... पण वाईट ह्याचे वाटते की तू लोकांच्या विचाराने प्रेरित होऊन हे सगळे बरळतो आहेस... ! मूर्खा नेहमी स्वतःचा तर विचार केला आहेस तू !! एवढी ही अक्कल नाही की काय तुला ? कालपर्यंत ठीक होतास... आज काय नाटकं चालू झाले ? माझे दुसरे मन आतून जोरात ओरडले... आणि तो आर्त स्वर ऐकून मी फ्लॅशबॅक मध्ये गेलो...

दर रविवारी डॉमिनोजचा सिंपल चीज पिझ्झा, महिन्यातून एकदा हॉटेलिंग, कॉलेजमध्ये असताना मोठ्या बहिणीची मरेस्तोवर वापरलेली जुनी स्कूटी ! आणि त्यानंतर घेतलेली पहिली स्पेंडर ! आणि मग आर्थिक सुबत्तेनंतरची सुझुकी !  लगोलग फक्त इमर्जन्सी साठी का होईना पण घेतलेली मारुतीकार ! बिग-बझार/विशाल/जस्ट कॅजुअल्स वगैरे मोठे ट्रेंडसेटर्स आणि त्यांच्या भल्यामोठ्या डिस्काउंट्स ने भारावून जाऊन एक ऐवजी घेतलेले ३-३ जीन्स आणि ४-४ शर्टस ! ३०० रुपयांपेक्षा एक पैसा जास्त न देता घेत आलेले बूट, पहिल्यांदा मनासारखा पगार कमावायला लागल्यावर आधी ते बदलावेसे वाटले - आणि तेव्हा जे घेतले ते २४०० रु चे बूट ! (अजूनही वापरतोय ३ वर्षे झाली -मस्त आहेत !) बॉडी मसाज करणारी ओ२ स्पा, फोर फाउंटन स्पा, वगैरे मुळे तर ३ महिन्याचा ठकवा एकदम निघून जातोय हे समजल्यावर त्यासाठी लागणारे ९०० रु. किरकोळ वाटू लागले.... इ. इ. इ.

माझ्या बुद्धीवादी आणि व्यवहारी मनाने मला एकदम जमिनीवर आणले... हे सगळे काय लोकासाठी केले होते ? स्वतःसाठीच तर केले ना ? जन्माला आल्यापासून मी जे काही केले ते माझ्यासाठीच केले... संत संस्कृती लाभलेल्या महाराष्ट्रात जन्माला आल्यामुळे जे काही थोडेफार लोकांसाठी केले असेल ते केवळ ह्या मातीचा गुणधर्म म्हणून सहज विसरता येण्यासारखे आहे ! परंतु आपण स्वतःसाठी काही केले नाही, म्हणून आता एन्जॉय करू असे मला वाटणे हा खरंच स्वार्थीपणा आहे, नुसता स्वार्थीपणा नव्हे तर निगरगट्टपणा आणि अप्पलपोटेपणाचे मिश्रण आहे !

पहिले मनं'च योग्य होते (म्हणजे... ह्या बाकीच्या लोकांच्या विचाराने दुसरा विचार करण्याचा आधीचे !!) जे आधी ठरवले होते तेच बरोबर होते....आणि तसेच वागले तर स्वतःला पटणारा आणि रुचणारा निर्णय घेता येईल.... जगाला उत्तरे देण्याची पर्वा २६ वर्षात कधी केली नाही मग आता काय मोठंसं  -- असो विषयांतर झाले जरा,

तर,

 आम्ही निघालो कॅनडाच्या वाटेवर.... कंपनीच्या कामासाठी !

"ऑन-साईट" हा शिक्का बसणे किती महत्त्वाचे आहे हे शिक्का बसल्यावरच समजते... खूप नवीन गोष्टी शिकायला मिळतात... वगैरे वगैरे पट्टी पढवून ऑफिसकलिग्स ने आम्हाला गुडबाय केले... मुंबई ते पॅरिस आणि पॅरिस ते कॅनडा असे विमान होते... !

मुंबईला जाताना खंडाळ्याजवळ खूप ट्रॅफिक जॅम होते...पाऊस पडत होता... जवळ जवळ ३० मिनिटे ट्रॅफिक मध्ये अडकून हळू हळू क्लिअर होताना पाहिले तर समोरच एक स्कॉर्पियो चा चुराडा झाला होता, शेजारच्या ट्रॅक मधून अतिवेगाने डिव्हाईडर तोडून गाडी ह्या बाजूला येऊन आदळली होती... मी कॅमेरा घेऊनच बसलो होतो -- बसल्याजागुनच फोटो काढला... आणि पुढच्या २ मिनिटात गाडी तिथून अगदी जवळून गेली आणि माझे हातच गार पडले.... काढलेला फोटो बॅक करून पुन्हा झूम करून पाहिला -- गाडीच्या बाहेर ड्रायव्हरच बॉडी पडलेली होती, पावसात भिजत होती, कपडे अंगावर नव्हते, बहुदा गाडीतून ओढून काढावे लागले होते....  खूप वाईट वाटले... प्रत्येकाचे कोणीतरी असते... वाट बघणारे, त्याची काय अवस्था झाली असेल....

प्लीज, सर्व वाचकांना विनंती आहे - गाडी हे एक मशीन आहे... माणसाचा भरवसा देता येत नाही, तर मशीनचा काय देणार? कितीही भारी ब्रेक असले तरी मनाचा ब्रेक -- उत्तम ब्रेक ! वेगाला आवर घाला... थोडा उशीर झाला तरी चालेल.. घरी जास्त वाट पाहावी लागेल... पण त्यासाठी आपण त्यांना कायमची वाट पाहण्यापासून तरी आवरू शकतो ना !

असो, जन पळ भर म्हणतील हाय - हाय ! खरे ठरवत आम्ही पुढील प्रवासाला लागलो, मुंबईत पोहोचल्यावर विमानतळाकडे जाताना बरेच खड्डे, सिग्नल्स, ट्रॅफिक आणि सैरावैरा धावणारे माणसांचे अडथळे ड्रायव्हरने बखुबी पार केले आणि ४.५ तास आधी विमानतळावर पोहोचवले !

आता २ तास तरी टाईमपास करणे भाग होते.. . आत जाण्याच्या प्रयत्नात एक सुरक्षारक्षकाने स्वतःचे ज्ञान मला वाटले की विमानाच्या फक्त ३ तास आधी यायचे वगैरे.... मी म्हणालो मी बसतो इथेच किंवा फिरतो.. तुमची वेळ झाली की मला आत सोडा.... !

पण माझा हा शालीनपणा पाहून की काय तो म्हणाला - "अभी कहा घुमोगे... जाव अंदर, अगली बार याद रखना... ! "  (अगली बार कोण येतंय मरायला.... आम्ही काय रोज अप-डाउन करणार थोडीच ! )

आत गेल्यावर चांगलाच फरक जाणवला ... फुल AC,  कमी गर्दी, हाउसकीपींग स्टाफ दिमतीला..  अरे वाह... ! आणि ह्यामागचे गुपित सिक्युरिटी चेक होऊन टर्मिनल समोर उभे राहिल्यावर जाणवले  ! समोसा ७५ रु, वडापाव ९०/- आणि इडली (२) ९५ रुपये किमतीला विकत असतील तर मग त्या हिशेबात फॅसिलिटीस कमीच म्हणायच्या की !! ( अरे चोरांनो!!)

सध्या तरी विमानाची प्रतीक्षा करत लाउंज मध्ये बसलो आहे...बघू विमान कधी उडतंय... आणि पुढे काय काय होतंय... !

-

आशुतोष दीक्षित.