यु कॅनडू (इट)!! (भाग-२)

१२० रु समोसा आणि १४० रु ब्रेड सँडविच.... ! ?? जवळ जवळ बेशुद्ध होण्याची वेळ आली होती माझ्यावर.... !!

विमानाची वाट पाहत त्या आलिशान लाउंजमधल्या चकचकीत फरश्या, मोबाईल आणि लॅपटॉप चार्जर्स, स्वच्छतागृह,टापटीप कपड्यातले अटेंडंटस, फुकट इंटरनेट सेवा, ह्या सगळ्याचा खर्च कसा कमावतात ते चटकन ध्यानी आले..... आणि माझ्या सदाशिवपेठी मनाने आतून ओरडून सांगितले - विमानप्रवास महाग म्हणून हे सगळे महाग... असे नव्हे,  तर हे सगळे महाग म्हणून विमान प्रवास मध्यमवर्गाच्या आवाक्याबाहेरचा !!

सुचेता कडेठाणकर ताई एका लेखात म्हणाल्या होत्या, -> "आय ऍम द चोझन वन. " आज आपण घातलेल्या "तंत्रा" च्या टी-शर्टवरची कॅच लाईन एकदम मान वर काढून आपल्याकडे वाकुल्या दाखवत बघू लागल्यासारखं  ! - अगदी त्याचा प्रत्यय आला, आणि एवढ्या पॅसेंजर्स मध्ये बसून सुद्धा माझे मला अगदी निरागस आणि प्रतिक्षिप्त म्हणतात तसे हसू आले... 

आणि मग त्यामागोमाग ह्या गर्दीत जरी मिसळलेला असलो तरी, "ह्यांच्यासारखा मी होणार नाही.... वाण नाही... आणि गुण  तर नकोच.. . भले लोक कंजूस म्हणोत, की  मुर्ख म्हणोत... बावळट म्हणोत की Boaring म्हणोत... पण उगीच हे असलं मोठेपणाचं आणि टेंभा मिरवण्याचं ओझं खांद्यावर वागवण्याच्या नादात दोन दोनशे रुपयांच्या चकचकीत उभट ग्लासमधील कॉफी पिता पिता अगदी पातळ प्लॅस्टिक लावलेले आणि सजवलेले सँडविच खाऊन आपल्या खिशाचे वजन कमी करून घेणे जमायचे नाही !! आणि तसेही अश्या माणसाला शुद्ध मराठीत "माजोरडा" किंवा "अंमळ आगाऊच" म्हणतात...

माझ्या अंतर्मनातला प्रभाकर पणशीकर जागा होऊन ओरडला.... "वर वर कितीही कपडे, भाषा, काम, वागणूक जरी तुम्हाला तशी दिसत असल्याचा तुमचा समज असला.... तरी... तो मी नव्हेच !! !!"

विमान लागल्याची घोषणा झाली आणि मी टर्मिनल २ए पासून पुढे निघालो, विमानात बसताना आधी लहान मुले आणि फॅमिली, मग वयोवृद्ध आणि मग बाकीचे ह्या कार्यप्रणालीचे कौतुक वाटले... आणि क्षणभरात गरवारे कॉलेजमध्ये असताना डेक्कन वरून कर्वेनगर ला चिंचा बोरे विकायला जाणाऱ्या म्हातारीची आठवण आली..एकदा मी बस मधून जात असताना ति आणि ड्रायव्हर दात ओठ खाऊन सभ्य शिव्या देत होते एकमेकांना.....ड्रायव्हरने गाडी पुढे दामटली होती आणि म्हातारी गर्दीत चढू शकली नाही पण तिची टोपली मात्र आत गेली होती... असो,

इथे विमानातल्या अडचणीच्या सिट, अगदीच मुंबईय्या स्टाइलने (इंच इंच लढवू... )  बांधलेले बाथरूम्स, पाहिल्यावर मला आपण रेल्वे, बस, रिक्षाच्यामध्ये राजेशाही थाटांत राहतो असे वाटू लागले....इतके दिवस ते देखिल कंजस्टेड वाटायचे

विमानात पाहिजे तेवढी चॉकलेट्स घेता येतात वगैरे जुन्या सिनेमा मध्ये दाखवलेले किंवा ऐकलेले अगदी खोटे असते... अस कोणी चॉकलेट्स चा ट्रे वगैरे घेऊन फिरत नाही.. ! (किंवा मग माझं नशीब आणि मी  ) 

विमानात प्रत्येकाला लिमिटेड स्नॅक्स, वाइन, ज्यूस, वगैरे मिळते, मुंबई ते पॅरिस हा प्रवास पटकन संपल्यासारखा वाटला, इथून जाताना बरेच आपले देशी चेहरे दिसत होते, पॅरिस वरून कॅनडाला जाताना मात्र अनेकविध लोक दिसले.... वेगळ्या रंगात...वेगळ्या ढंगात....!

टॅटू वगैरे पद्धतीने काहींनी मुद्दाम रंगरंगोटी केली होती, तर काहींना निसर्गानेच 'रंग पक्का आहे' ही पाटी अडकवून पाठवले होते... पॅरिस चे भलेमोठे विमानतळ पाहण्यासाठी दिवस कमी पडेल... मला तर फक्त तासभर होता त्यामुळे जास्त उडाणटप्पूपणा न करता माझे टर्मिनस गाठले आणि फुकट च्या सिमकार्डावरून घरी सुखरूप असल्याची पोच दिली,

फ्रेंच भाषेचा प्रचंड अंमल जाणवला, स्वाभिमान आणि काही अंशी कडवेपणादेखील, आपल्याकडे दक्षिणेकडे गेलो की काहिस तसच जाणवतं..

पॅरिसहून कॅनडा ला येतानाचे विमान जरा आधी पेक्षा बरे होते, त्या विमानात अनेक फ्रेंच दिसले, भेटले, आणि  आमचे सांकेतिक संभाषण सुरू झाले... (त्या सगळ्यांना इंग्रजी येते अस नाही, आणि त्यांना त्याची गरजही वाटत नाही... ) विमान कॅनडाच्या धावपट्टीवर उतरले.. आणि सर्वांनी टाळ्या वाजवून वैमानिकाचे आभार आणि अभिनंदन प्रकट केले....

"त्यात काय" !! ---  "त्यासाठीच तर तो पगार घेतोय" !!   किंवा रिक्षांत बसल्यावर फक्त मीटरकडे पाहणारे लोक असतात तसे विमांप्रवास संपेस्तोवर पाकिटातले पैसे मोजण्याच्या मी आपल्या पुणेरी म्हणा ....इंडियन म्हणा.... जे असेल, त्या मेंटॅलीटीचा क्षणात त्याग करून ताबडतोब टाळ्या वाजवणाऱ्यांत सामील झालो....!!

खूप छान वाटले, कारण विमान कैक हजार फुटांवरून जाताना समजा काही कमी जास्त झाले तर ती इजा कोणाकडे किती पैसे आहेत किंवा बँकबॅलन्स आहे त्यावर अवलंबून नसतेच... तिथे अधांतरी असताना 'सब प्यादे एक जात' !! आणि त्या परिस्थितीतून पुन्हा अतिशय सुखरूपपणे वस्तुस्थितीत आणणाऱ्या वैमानिकाचे असे कौतुक झाले तर तो देखील नक्कीच अधिक जोमाने आणि जबाबदारीने काम करेल.... ह्या वेळी विमानातून बाहेर पडताना गुड बाय...बॉन जुने(गुड डे) म्हणणारा सगळा केबिन-कृ मला जास्तच अदबशीर वाटला... Cheers to the policy of ==> Give Respect - Take Respect !!

विमानतळावरून इमिग्रेशन साठी गेलो, शक्य तेवढे मनमोकळे, साधे राहण्याचा प्रयत्न करा, फुकट मिजास कवडीची देखील नको... हे तत्त्व पाळल्यामुळे अजिबात त्रास न होता फक्त २ प्रश्नांची उत्तरे देऊन मी लगेच सटकलो  त्यातून दुसऱ्या प्रश्नात मी स्वतः शाकाहारी आहे हे सांगितल्यावर तर त्या ऑफिसर ला विचारण्यासारखे काही राहिलेच नाही असे तिने दर्शवले... बॅगेज सेक्शन मधून बॅग उचलली.. पाहतो तर ह्या बदमाशांनी दुसऱ्या बाजूचे बॅग चे हँडल पण तोडून टाकले होते.... घ्या... आता पुढचा संपूर्ण प्रवास फक्त बॅग ओढण्यासाठीच्या दांडीच्या आधारे करावा लागणार... विचार करत  बाहेरचा रस्ता गाठू लागलो... इथे विमानतळावरून निघताना तुम्हाला शहराची माहिती देणारी पुस्तके मिळतात (फुकट) -( कारण,  महाबळेश्वर दर्शन, लोणार ची कथा, कोंकण कसे पाहाल, मध्यप्रदेश ची सहल वगैरे अशी पुस्तके आपण विकत घेतो नेहमी कुठे गेलो की... !!)

तर, ती CITY GUIDEs घेऊन बाहेर पडलो, हॉटेलची शटल आलेली होतीच, त्यामध्ये बसलो आणि आलिशान हॉटेल मध्ये दाखल झालो... चकचकीत दिवाणखाने आणि फायरप्लेस पाहून पुन्हा आठवणी जाग्या झाल्या...( मालाडचा म्हातारा.. म्हाताऱ्याची बायको.. शेकोटीला आले...!!) - रूम ची किल्ली घेतली, सामान आत ठेवून बाथटब मध्ये  गरम पाणी भरून तासभर डुंबलो त्यामुळे १८ तास प्रवासाचा  शारीरिक आखड थोडा कमी झाला, घरून सोबत आणलेले दाण्याच्या कुटाचे लाडू, पुरणपोळी,बाकरवडी आणि हॉटेल च्या वेलकम किट मधले हॉट चॉकलेट पिऊन आता मी मस्त झोपणार आहे,

अरे हो -- दाराजवळ "Recharging - do not distrub"  अशी पाटी पाहिली होती, ति बाहेरून अडकवून येतो म्हणजे  माझा थकवा घालवण्याचा रामबाण उपाय करता येईल -> ....खाल्ल्यावर झोपणे आणी भूक लागल्यावर उठणे !! 

-आता महिनाभर आमच्या चॅनलवर एकच पिक्चर --- "परदेस" !

--

आशुतोष दीक्षित