यंदा कर्तव्य आहे

सध्या अस्मादिकांच्या लग्नाचे प्रयत्न चालू असल्याने विविध प्रकारचे अनुभव आम्हांस येत आहे. त्यात आई-वडलांबरोबर आम्ही स्वतः: लग्नासाठी पुढाकार घेऊन प्रयत्न करत असल्याने अनेक गोष्टी आम्हाला प्रत्यक्ष अनुभवायला मिळत आहेत. आयुष्यातील इतर अनुभवांप्रमाणेच ह्या उपक्रमात सुद्धा काही चांगले तर काही विचित्र अनुभव येत आहेत. त्यापैकी आम्हाला आलेले काही विचित्र अनुभव व त्या अनुषंगाने आम्हांस पडलेले प्रश्न इथे मांडण्याचा हा प्रयत्न. याद्वारे माझी प्रौढी मिरवणे, मला खूप कळतं असा उद्देश नसून मला जे अनुभव विचित्र वाटले त्यावरील वाचकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणे त्याद्वारे योग्य तिथे माझ्या विचारामध्ये बदल घडवून आणणे हा उद्देश आहे. त्यामुळे वाचकांनी आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवाव्यात. मी हे नमूद करू इच्छितो की मी मुलगा असल्याने मला आलेले अनुभव हे मुलींबद्दल आहेत. त्यामुळे कुणीही कृपया मी फक्त मुलींबद्दलचे विचित्र अनुभव लिहिले आहेत असा आक्षेप घेऊ नये. खरं सांगायचं तर यातील काही अनुभव हे मुलगा-मुलगी यांना सामायिक असण्याची दाट शक्यता आहे. ह्या लेखाला प्रतिक्रिया लिहून अथवा स्वतंत्रपणे मुलींनीदेखील त्यांना मुलांकडून काही विचित्र अनुभव आले असल्यास ते लिहावे जेणेकरून समस्त उपवर मुलांना जाणता-अजाणता काही चुका झाल्या असल्यास त्या कळतील व या सर्वांचा फायदा कदाचित भावी उपवर-उपवधू मंडळींना होईल. विषयाची सुरुवात ही लग्नप्रक्रियेला ज्याने सुरुवात होते त्या विषयापासूनच करतोय. जमेल तशी ह्या धाग्यात भर घालण्याचा मानस आहे. आता नमनालाच घडाभर तेल न दवडता प्रत्यक्ष विषयाला हात घालतो.

१. फोटो:
लग्न ठरवताना मुला-मुलीचे एकमेकांना दिसणे हे खूप महत्त्वाचे आहे हे कुणीही मान्य करील. बहुतांश लोकांना समोरची व्यक्ती खूप सुंदर असावी ही अपेक्षा नसते तर ती व्यक्ती दिसायला आपल्याला आवडली पाहिजे एवढीच माफक अपेक्षा असते. यालाच काही लोक क्लिक होणे असे म्हणत असावेत. अर्थात समोरच्या व्यक्तीचे दिसणे हा आपल्या मनाच्या कॅमेऱ्यातील पहिला क्लिक असतो असे माझे मत आहे व बरेचदा त्यानंतरच पुढे जाऊन एकमेकांशी बोलून मानसिक पातळीवर क्लिक होण्यापर्यंत प्रयत्न करायचे की नाही हे ठरत असते. हल्ली बरेचदा मुले-मुली दुसऱ्या शहरात व देशात राहत असतात. त्यामुळे बहुतांश वेळा समोरच्या व्यक्तीचे पहिले दर्शन हे फोटोमधूनच होते. त्यामुळे फोटोला तसे खूप महत्त्व आहे असे माझे मत आहे.

तर माझा अनुभव असा आहे की बरेचदा फोटोमधून आपण जसे दिसत नाही तसे दाखवण्याचा प्रयत्न जाणतेपणी किंवा अजाणतेपणी केला जातो. बरेचदा ह्या फोटोंमधून आपण प्रत्यक्ष दिसतो त्यापेक्षा अधिक चांगले दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो. जास्त गोरेपणा किंवा एकसुद्धा खड्डा/पुळी नसलेला चेहरा म्हणजे अधिक चांगलं दिसणं असा काही जणांचा समज का असतो ते देवच जाणे. स्टुडिओमध्ये काढलेले फोटो हे बरेचदा ह्या प्रकारात मोडतात. अशा फोटोमध्ये बहुतांश वेळा व्यक्तीचा रंग, त्वचेचा पोत इ. गोष्टी इतक्या बदलल्या जातात की फोटोमधील व प्रत्यक्ष दिसण्यात जमीन-अस्मानाचा फरक असतो. त्यामुळे निव्वळ अशा स्टुडिओ फोटोवरून दोघांनी एकमेकांना भेटायचे ठरवले तर मोठा भ्रमनिरास होण्याची शक्यता असते. काही वेळा फक्त स्टुडिओ फोटो पाठवले जातात व समोरच्यांकडे नॉन-स्टुडिओ फोटोची विनंती केल्यास त्यांना ते न रुचल्याचा अनुभव अस्मादिकांना आलेला आहे.

याच्या विरुद्ध देखील काही अनुभव आले आहेत. काही फोटो हे नीट फोकस न झालेले, काढताना हात हालल्याने फोटोत shake आलेले, अपुऱ्या/अती उजेडात काढलेले अशा प्रकारातले असतात व त्यामुळे जरी मूळ व्यक्ती प्रत्यक्षात दिसायला चांगली असली तरी फोटोमधून तसे दिसत नाही. असे झाल्यास त्या व्यक्तीने स्वतः:चेच नुकसान करून घेतल्यासारखे आहे. तसेच घरातच भरपूर पसारा असताना काढलेले फोटो, मित्र-मैत्रिणींबरोवर काढलेले ग्रुप फोटो, खूप दुरून काढलेले फोटो असे फोटो पाठवणे देखील योग्य नाही असे वाटते.

आणखी एक म्हणजे फोटोमधून समोरच्या व्यक्तीच्या संपूर्ण visual व्यक्तिमत्त्वाची कल्पना यावी अशी अपेक्षा असते. कधी कधी एखादी व्यक्ती जाड असल्यास फक्त चेहऱ्याचाच फोटो पाठवला जातो. त्यातून व्यक्तीच्या संपूर्ण दिसण्याची कल्पना येत नाही. त्यामुळे किमान एखादा फोटो हा संपूर्ण उंचीचा असावा असे मला वाटते. अशा संपूर्ण उंचीच्या फोटोची विनंती केल्यावर काही लोकांना राग आल्याचे मी अनुभवले आहे. कधी कधी सर्व फोटोमध्ये व्यक्तीने गॉगल घातलेला असतो. बरेचदा गॉगल घातलेले फोटो दिसायला चांगले असले तरी डोळे झाकले गेल्यामुळे गॉगल न घातलेल्या व्यक्तीच्या डोळ्यांमधून जे व्यक्त होते ते गॉगल घातलेल्या फोटोमध्ये पूर्णपणे झाकोळले जाते. त्यामुळे गॉगल घातलेले फोटो शक्यतो टाळावेत. तसेच आपण पाठवत असलेले फोटो हे बऱ्यापैकी नवीन असावेत.

आपल्या फोटोमधून आपण प्रत्यक्ष जसे दिसतो तसेच दिसत आहोत का असा प्रश्न सर्वांनीच आपण समोरच्याला पाठवत असलेले फोटो पाहून करावा. तुम्हाला स्वतः:ला याची कल्पना येत नसल्यास आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणींना आपले फोटो दाखवून त्यांचे याबाबतीतले (शक्यतो मुलांनी मैत्रिणीचे व मुलींनी मित्राचे) मत घ्यावे.

ह्या सर्व मुद्द्यांचे सार हे आहे की आपण प्रत्यक्ष जसे दिसतो तसेच फोटोमधून दाखवले जातोय याची सर्वांनीच काळजी घ्यायला हवी. लक्षात घ्या की लग्न ठरवताना प्रामाणिकपणे सर्व माहितीची देवाण-घेवाण होणे अपेक्षित असते. आपण जसे दिसत नाही तसे दाखवले जाण्याचा प्रयत्न करणे हे एकप्रकारे असमंजसपणाचे लक्षण आहे असे मला वाटते. आपण प्रत्यक्षात जसे दिसतो त्यापेक्षा फोटोमध्ये अतिशय वेगळे भासवले जात असू तर प्रत्यक्ष भेटून दोन्ही कुटुंबांचा वेळ, पैसा, श्रम वाया जाण्याची खूप जास्त शक्यता असते याचा सर्वांनीच विचार करावा.