गाणे ओळखा

मत्प्रिय मनोगतींनो,
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने एका प्रसिद्ध गीताचे भाषांतर खाली देत आहे. मला कल्पना आहे, की मूळ गाणे ओळखणे
कुणासही अजिबात अवघड जाणार नाही. त्यामुळे  धृवपद लगात्कारात न देता आहे तसेच दिले आहे.
यात पहिली जी  दोन कडवी आहेत, त्यांना गाण्यात  पार्श्वसंगीत नाही. आणि त्यामुळे हे गाणे,
----------च्या खाली दिलेल्या कडव्यावरूनच ओळखले जातेय. असो.

माझ्या देशातिल जनहो, द्या नाऱ्यावरती नारा
हा शुभदिन आहे अपुला, फडकवू तिरंगा प्यारा

पण विसरू नका सीमेवर, वीरांनी प्राण गमविले
त्यांचीही सय होऊ दे(२), जे परतुनी कधी ना आले(२)
-----------------------------------------------
माझ्या देशातिल जनहो, ऐका साश्रू नयनाने
जे अमर हुतात्मे झाले, आठवू त्यांची बलिदाने
विसरूच नये आपण हे, त्यास्तव ऐका हे मनाने
जे अमर हुतात्मे झाले, आठवू त्यांची बलिदाने

झाला क्षत हिमपर्वत जो, स्वातंत्र्यही अंकित झाले
लढले ते, श्वास असेतो, मग धारातीर्थी पडले
शिर देउनी संगिनिहाती, पडले ,पण अभिमानाने ॥१॥....जे अमर हुतात्मे झाले

होता दीपोत्सव जेंव्हा, ते खेळत होते होळी
घरी आपण होतो अपुल्या, ते झेलित होते गोळी
होते ते धन्य शिपाई, देशाचे प्रेमदिवाणे ॥२॥....जे अमर हुतात्मे झाले

कुणी शीख नि जाट मराठा, कुणी गुरखा कुणी मद्रासी
सीमेवरती मरणारे , होते ते भारतवासी
रक्त ते भारतिय होते, भिजला हिमपर्वत ज्याने ॥३॥....जे अमर हुतात्मे झाले

रक्ताने भिजली काया, तरीही बंदूक उचलुनी
मारिले दहा एकाने, कोसळले मग उन्मळुनी
जेंव्हा अंतिम क्षण आला, म्हणतात कसे, "आम्ही जातो"
"सुखी राहा मम बंधूंनो, आम्ही अमुच्या गावा जातो",
ते वेड काय वर्णावे, हा ऊर भरे अभिमाने ॥४॥....जे अमर हुतात्मे झाले

विसरूच नये आपण हे, त्यास्तव कथिले काव्याने
जे अमर हुतात्मे झाले, आठवू त्यांची बलिदाने
जय हिंद, जय हिंदवी सेना, जय हिंद, जय हिंदवी सेना
जय हिंद, जय हिंद, जय हिंद.......................