तीच खिडकी तोच दरवाजा जुना

तीच खिडकी  तोच दरवाजा जुना
अन तिच्या गल्लीतला रस्ता जुना
शोधतो आहे असा मी आरसा
दाखवी जो चेहरा माझा जुना
सवय होती  पावलाना  चालण्याची
थांबते सारे जिथे कट्टा जुना
गाव आता सोडुनी  मी  चाललो
मित्र जेथे राहतो माझा जुना
संपले मतदान येथे ज्या  क्षणी
कालचा मुद्दा नवा झाला जुना
कालच्या वीराणश्या बागेमधे
आज ही येतो कसा भुंगा जुना
नेहमीची बरसणारी आसवे
पावसा झाला दगा आता जुना
बातमी माझी कुठे कळली तिला
राहिला बदलायचा पत्ता जुना
मी फुलांचे प्रेत जेंव्हा पाहिले
आठवाया लागला दंगा जुना
                  ------स्नेहदर्शन