त्याच किनारी

त्याच किनारी कधी भेटतिल
फिरणारे आभास कुणाचे
भास किती सोबत येणारे
कोणाच्या पाऊलखुणांचे

त्याच किनारी समुद्र उघडा
दिशा मोकळ्या वारे उघडे
उघड्या रात्रीच्या अंगावर
झुळझुळते चमचमते कपडे

त्याच किनारी बसली असते
ओली वाळू शहारणारी
पुन्हा पुन्हा ओल्या लाटांचा
पदर आपुला सावरणारी

त्याच किनारी कुणी ठेवला
थोडा अवघड थोडा अवजड
किती हजारो वर्षांपासुन
खडक बैसला ओबडधोबड

रात्र उतरते लाटांवरती
वारा धरतो हात दिशांचा
खडकावरती अंधाराशी
गप्पा सगळ्या युगायुगांच्या

टिचभरशा आयुष्यासोबत
त्याच किनारी कोणी वेडा
येउन बसतो एक एकटा
स्वप्न घालते त्यास गराडा

ना उमगे भाषा रात्रीची
लाटांची आणिक वाऱ्याची
वाळूवरती अंग टाकुनी
कुजबुजतो अपुल्याच मनाशी

किर्र दाट एकांतापाशी
हे भवती आभास कुणाचे
आणि न उमगे त्या वेड्याला
हे सोबतचे श्वास कुणाचे