सोशीन सर्व आता सल मी पराभवांचे!
परडीत काळजाच्या काटे तुझ्या फुलांचे!!
मुक्ती नसेल,थोडी शांती तरी मिळाली;
स्वीकारताच ओझे खांद्यावरी चुकांचे!
दे नाव कोणतेही नात्यास आपल्या तू;
माझ्या तुझ्यात आहे नाते युगायुगांचे!
काही कवी असेही असतात की जयांचे;
लिहिणे कळ्याफुलांचे, जगणे जनावरांचे!
इतकीच व्यक्त केली इच्छा कलेवराने.....
‘आता तरी मिळू दे खांदे मला मुलांचे!’
कल्लोळ वेदनांचा जेव्हा असह्य झाला;
बुजवून टाकले मी रस्तेच आसवांचे!
कोणी दिली दवंडी वस्तीत पावसाची?
गेले कुण्या दिशेला सारे जथे ढगांचे?
इतके कुरूप नव्हतो आम्ही दिसावयाला;
वाट्यास फक्त आले प्याले विटंबनांचे!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१