काळजास सहजी माझ्या कुसकरून गेले कोणी!
निमिषात सर्व स्वप्नांना विसकटून गेले कोणी!!
मी एक जणू विझलेला निस्तेज निखारा होतो;
हृदयात आस जगण्याची चेतवून गेले कोणी!
अडवाया गेलो वणवा वस्तीच्या वेशीपाशी;
तितक्यात घराला माझ्या पेटवून गेले कोणी!
आताच स्मृतींना साऱ्या कुलुपात ठेवुनी आलो!
आताच मनाला माझ्या उचकटून गेले कोणी!!
ठाऊक कळ्यांना नाही, ठाऊक फुलांना नाही....
इतकेच मलाही स्मरते...दरवळून गेले कोणी!
अद्याप मनाचे माझ्या हे पान पान थरथरते!
वाटते असे की, नुकते सळसळून गेले कोणी!!
ती साद कुणाची होती? मी कुणास शोधत आहे?
जवळून माझिया बहुधा झुळझुळून गेले कोणी!!
सूर्याचा प्रकाश किंवा ती हवा असो वा पाणी;
म्हणते का कोणी? त्यांना वापरून गेले कोणी!
मी अजून चालत आहे निष्ठेचा एकच रस्ता....
जो तमात आयुष्याच्या दाखवून गेले कोणी!
उघड्यावर निजला होता भररस्त्यावरती कोणी...
आताच कफन त्याच्यावर पांघरून गेले कोणी!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१