हाक केव्हाची कुणाची ऐकतो मी?

हाक केव्हाची कुणाची ऐकतो मी?
संपला रस्ता तरीही चालतो मी!

तू अणूरेणूत माझ्या व्यापलेला;
अन् तुला दाही दिशांना शोधतो मी!

तर्क करताना मती कुंठीत होते.....
बंद डोळ्यांनी कुणाला पाहतो मी?

अंतरी दिव्यत्व ते चमकून गेले.....
कल्पनेने चित्र आता काढतो मी!

जाहले काळीज चकनाचूर इतके;
की, उभे आयुष्य ठिकऱ्या मोजतो मी!

लौकिकार्थाने प्रपंचाचा पसारा.....
आवराया बायकोवर सोडतो मी!

बायको निष्णात असली की, न चिंता!
त्यामुळे ऐसा सडासा राहतो मी!

एक नजरेचा तुझ्या तो खेळ होता.....
कैद नजरेची तुझ्या उपभोगतो मी!

लोचनांचा पार झाला कोंडवाडा!
आसवांची ही गुरे सांभाळतो मी!!

थांब न्याहाळीन मी गगना! तुलाही;
माणसांचे रंग सद्य: पाहतो मी!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१