स्वप्न मलाही बघावयाची आवड होती!
पण, सत्याची डोळ्यांवरती झापड होती!!
ओघळलेल्या आयुष्याची हळहळ उरली....
जणू जिंदगी हिंदळणारी कावड होती!
लोक समजले जिवावरी तो उदार झाला.....
जगण्यासाठी केलेली ती धडपड होती!
तुला न आली कधीच ऎकू साद दिलेली;
उरात तुझिया सदैव माझी धडधड होती!
तुटतानाही मला मिळाला जणू दिलासा;
पाहिलीस तू कशी जाहली पडझड होती!
मित्र मोजके; शत्रू त्याला असंख्य होते!
हळवा होता, परंतु वाणी परखड होती!!
कुणी आणले मला? कसा मी घरी पोचलो?
परतायाची वाट केवढी अवघड होती!
विकायला मी बसता सोने...कुणी न आले!
विकायचो मी माती तेव्हा झुंबड होती!!
.............प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खनिगतेलतंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१