"स्मशानी अस्थि माझ्या घ्यावया येवू नका कोणी;
इथे दिसतील माझी फक्त स्वप्ने राख झालेली........."
....................प्रा. सतीश देवपूरकर
प्राण माझा जायचीही वाट नाही पाहिली!
केवढ्या घाईत माझी प्रेतयात्रा चालली!!
मी किती चुपचाप होता प्राण माझा सोडला;
हातचे टाकून सारी माणसे का धावली?
आपले ज्यांना म्हणालो कापले त्यांनी खिसे;
कापला ज्यांनी गळा ती माणसेही आपली!
लाज झाकायासही ना लाभला कपडा कधी;
माझिया प्रेतावरी ही शाल कोणी टाकली?
वस्त्रही त्यांनीच माझ्या जिंदगीचे फेडले;
प्रेत माझे नागवे अन् लाज त्यांना वाटली!
मी जसा दिसतो तुम्हाला मी असे अगदी तसा;
कोणती सांगा कधी मी गोष्ट माझी झाकली?
हाक ज्यांना देत होतो, हीच का ती माणसे?
मी निघालो जायला अन् ती पुकारू लागली!
जीवनाच्या सांजवेळी एकटा मी एकटा!
सूर्य ढळला की न थांबे सावलीही आपली!!
पेटली माझी चिता अन् परतलो मीही घरी;
आसवे माझीच होती जागजागी सांडली!
मी किती लक्षात होतो, केवढ्या माझ्या स्मृती?
केवढी श्रद्धांजलीची भाषणेही रंगली!
माझिया श्राद्धास पहिल्या काय गर्दी लोटली!
एकटी तसबीर माझी कोपऱ्याला थांबली!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे
फोन नंबर: ९८२२७८४९६१