ही तुझ्या कृपेची किमया...लाभली मुक्याला वाणी!
जी दिलीस दु:खे मजला त्यांचीच जाहली गाणी!!
ना तरंग सुखदु:खांचे, ना ओढ कुठे झरण्याची....
दुनियेच्या डोहामधले मी म्हणजे निश्चल पाणी!
दरवळू लागली आहे श्वासात कस्तुरी माझ्या;
ही तुझ्याच अस्तित्वाची समजावी काय निशाणी?
बघ तुझी लोचने सुद्धा हिंदळू लागली आता...
बहुतेक सारखी आहे दोघांची प्रेमकहाणी!
वैराण वाटते मजला ही वर्दळ शहरामधली;
वाराही छेडत आहे तळमळती एक विराणी!
उधळीत राहिलो नुसता मी रंगगंध हातांनी;
व्यवहार समजला नाही, ना कळली देणीघेणी!
का स्तुतीमुळे हुरळू मी? का निंदेने कचरू मी?
परमेश्वर आता देतो लेखणीस माझ्या वाणी!
थकतील हात खणताना, उरतील हिरे अर्थांचे!
ह्या नव्हेत गझला माझ्या, ह्या चैतन्याच्या खाणी!!
.............प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खनिगतेलतंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१