मरणाच्या छायेमध्ये बागडणे सोपे नाही!

मरणाच्या छायेमध्ये बागडणे सोपे नाही!
फासावर चढता चढता गुणगुणणे सोपे नाही!!

आजन्म राहिली माझ्या पायात मुलायम बेडी;
रेशीमगाठ प्रेमाची सोडवणे सोपे नाही!

लागेल थांगही कोणा त्या अथांग अवकाशाचा;
आकाश तुझ्या डोळ्यांचे उलगडणे सोपे नाही!

हिंडती चोरपायांनी बगळ्यांच्या नजरा जेथे;
नादात आपल्या तेथे वावरणे सोपे नाही!

आयुष्य वेचले अवघे शिंपले वेचण्यासाठी....
लाखात एकही मोती सापडणे सोपे नाही!

छेडली तार त्याने अन् धडधडू लागली हृदये...
मैफलीस इतक्या सहजी मंतरणे सोपे नाही!

लावली चूड हातांनी, पाहिली राख डोळ्यांनी!
आपलीच स्वप्ने आपण सावडणे सोपे नाही!!
 
.............प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खनिगतेलतंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
    फोन नंबर: ९८२२७८४९६१