मी तुझ्या दारात होतो!

मी तुझ्या दारात होतो!
अन् तुझ्या शोधात होतो!!

लोकनिंदेला ना भ्यालो;
आपल्या नादात होतो!

लोक लाथाडून गेले.....
काय मी रस्त्यात होतो?

ते पवित्रे घेत होते;
मीच अंधारात होतो!

मी कसा विश्वास ठेवू?
रोज माझा घात होतो!

जहरही प्यालो खुशीने...
मी तुझ्या शब्दात होतो!

दोर फासाचा बिथरला...
मीच उलटा गात होतो!

ज्यामधे निष्ठा जिवाची;
त्यात तो निष्णात होतो!

अनुभवाने बोललेला...
शब्द हा सिद्धांत होतो!

काय, माझी याद आली?
मी तुझ्या लक्षात होतो?

पाहिले चोरून मीही;
मी तिच्या डोळ्यांत होतो!

आज तारे माळते ती....
काल मी गजऱ्यात होतो!

का रडावे त्या नभाने?
रोज उल्कापात होतो!
           
.............प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खनिगतेलतंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
    फोन नंबर: ९८२२७८४९६१