कळेना लागला माझ्या जिवाला ध्यास कोणाचा?

कळेना लागला माझ्या जिवाला ध्यास कोणाचा?
जिथे जातो तिथे होतो मला आभास कोणाचा?

खळाळू लागले गात्री सुगंधी पाट रक्ताचे....
मला गंधाळणारा हा गुलाबी श्वास कोणाचा?

घरी आपापल्या गेले ऋतू असतील एव्हाना;
इथे रानात एकाकी झुरे मधुमास कोणाचा?

कधी ऎसे कधी तैसे, मिळाले सर्व नजराणे!
फुलांचा हार कोणाचा, कधी गळफास कोणाचा!!

कसे हे सोडवू कोडे? कसे हे चेहरे वाचू?
मला ना बांधता आला कधी अदमास कोणाचा!

पुन्हा मी मोकळा झालो, पुन्हा दे शाप एखादा....
नव्याने सांग मी भोगू अरे, वनवास कोणाचा?

तुला मी सोबतीसाठी किती हाका दिल्या होत्या;
कुणाला साद द्यावी अन् मिळे सहवास कोणाचा!

तुला जो भेटला, ज्याला तुझा दृष्टान्तही झाला;
कधी वाटेल का त्याला असा दुसवास कोणाचा?

मला आता न माझाही भरोसा राहिला जेथे;
करावा सांग मी तेथे कसा विश्वास कोणाचा?

उपाशी राहिलो का मी, कळाले आज पहिल्यांदा!
कधी बळकावला नाही असा मी घास कोणाचा!!

न देता आहुती होतो पुरा का होम कोणाचा?
यशस्वी यज्ञ का होतो विनासायास कोणाचा?

.............प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खनिगतेलतंत्रज्ञान विभाग,   
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१