फळे चाखली तेव्हा मजला अर्थ कळाला फुलण्याचा!

फळे चाखली तेव्हा मजला अर्थ कळाला फुलण्याचा!
घोट घोट मी अश्रू प्यालो, स्वाद समजला जगण्याचा!!

विरंगुळ्याला तुला नेमका  हवाच होता कुणी तरी;
सोस तुलाही हसण्याचा अन् सोस मलाही फसण्याचा!

पंख मिळाले सोनेरी; पण...हाय, गगन मी गमावले!
वरदानाच्या वेषामध्ये शाप मिळाला झुरण्याचा!!

सांग पाखडू कसे सुखाला? सुखासारखे दु:ख दिसे;
पाखडताना पाठ वाकली, बेत बिनसला दळण्याचा!

वाचवणारा थिटाच पडला, बलाढ्य ठरला बुडणारा!
बुडणाऱ्याने मनात होता चंग बांधला बुडण्याचा!!

एक चेहरा, रंग परंतू किती तऱ्हेने पालटतो!
घोर लागला त्यास केवढा, असण्यापेक्षा दिसण्याचा!!

कोसळणाऱ्या उंच कड्याची विरते जेथे किंकाळी.....
कुणी ऐकला असेल टाहो तिथे फुलांच्या कुढण्याचा?
            
.............प्रा.सतीश देवपूरकर
 भूशास्त्र व खनिगतेलतंत्रज्ञान विभाग,   
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१