सुज्ञपणाचा बुरखा मजला कधी न आला पांघरता!
तुझ्याप्रमाणे मला न आला तोल स्वत:चा सावरता!
वादळ आले क्षण काही पण, विसकटलो मी हाय किती!
युगे लोटली तरी न आला मला पसारा आवरता!!
काय फुलांच्या निमंत्रणाची वाट पाहतो भ्रमर कधी?
गुंजारव तो करू लागतो, बागबगीचे मोहरता !
अशाच एका रम्य सकाळी सुगंध झालो मीच स्वत:;
वाऱ्यासंगे रानफुलांच्या वस्तीमध्ये वावरता!
उभ्या उभ्या ती मला भेटली, बहरत गेला जन्म उभा!
फुलावयाला एक लाघवी स्पर्श पुरेसा ओझरता!!
कणाकणावर दिसू लागली चैतन्याची छाप मला!
तुझ्या अलौकिक लावण्याने डोळे माझे मंतरता
धार तळपत्या तलवारीची जरी माझिया जगण्याला;
तुझे रेशमी पाश तरीही मला न आले कातरता!
चालत आले शब्द शेवटी थेट मनाच्या गाभारी,
हृदयामधल्या भावफुलांच्या पायघड्या मी अंथरता!
स्फुरू लागल्या गझला ऐशा, जसा झरावा चंद्रमणी....
तुझ्या रुपाचे शरदचांदणे उरात माझ्या पाझरता!
.............प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खनिजतेलतंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१