भोवती अंधार वारेमाप आहे!
चालण्याचा पावलांना शाप आहे!!
रोज जगण्याची लढाई....रोज मृत्यू!
जीवनाचा काय थोडा व्याप आहे?
ते चवीने वेदना चघळीत होते;
चाखली कोणी सुखाची खाप आहे?
वेगळा ठेका, निराळा ताल माझा!
मी मृदंगाची चुकीची थाप आहे!!
मोठमोठ्यांना खटकलो त्यामुळे मी....
चहुकडे माझाच वार्तालाप आहे!
पाहुणा समजून केली सरबराई;
चावला तेव्हा कळाले साप आहे!
तेवढी खडतर हवी तुमची तपस्या;
कोणताही शाप घ्या.... उ:शाप आहे!
भोगली शिक्षा..न केलेल्या गुन्ह्याची...
आज ते म्हणतात...मी निष्पाप आहे!
टाळते दुनिया अशा का माणसाला?
नेमका जात्याच जो अश्राप आहे!
उंच मी आहे नसे हा दोष माझा!
मी जगाला लागलेली धाप आहे!!
अंगवळणी मी कधी पडलोच नाही!
काय मी इतके चुकीचे माप आहे?
.............प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खनिगतेलतंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे
फोन नंबर: ९८२२७८४९६१