मी तिच्या पत्रातला मजकूर होतो!

 मी तिच्या पत्रातला मजकूर होतो!   
भेटण्यासाठी तिला आतूर होतो!!

मायना लिहिताच लिहिणे ठप्प झाले.....
मी तिच्या चिठ्ठीतली हुरहूर होतो!

मीच गंधाळून, तेजाळून गेलो!
मी तिच्या श्वासातला कापूर होतो!!

मी तिचा एकांत इतका व्यापला की,
वाटले नाही तिला मी दूर होतो!

चूक ती माझी, तुझी, की, त्या वयाची?
एकमेकांच्यात दोघे चूर होतो!

मोठमोठ्यांची उडाली पार त्रेधा.....
मी अवेळी लोटलेला पूर होतो!

घेतला आलाप अन् टाळ्या मिळाल्या;
मी जगाला भावलेला सूर होतो!

खेळले आयुष्य माझ्याशी असे की,
  सूरपारंबीतला मी सूर होतो!

..........प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खनिगतेलतंत्रज्ञान विभाग,   
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१