गझल
पावले ऋतूंची मीही पाहणे जरूरी होते!
मी बरोबरीने त्यांच्या चालणे जरूरी होते!!
यायला निघाला होता मधुमास घरी माझ्याही....
मी घरात त्या वेळेला थांबणे जरूरी होते!
तो वहात गेला नुसता, वाऱ्याने नेले तिकडे.....
समजले न त्या मेघाला बरसणे जरूरी होते!
एकेक रंध्र दरवळले, मोहरली काया सारी;
मी मनोगते स्पर्शांची समजणे जरूरी होते!
धावणे दूर, पण साधे चालता मला ना आले;
मी अंगरखा स्वप्नांचा दुमडणे जरूरी होते!
त्यामुळेच त्यांच्या गझला वाटल्या कागदी मजला;
शब्दांत गंध आत्म्याचा मिसळणे जरूरी होते!
केवढा गारठा आहे या हवेत वार्धक्याच्या;
मी ऊब तुझ्या स्मरणांची मुरवणे जरूरी होते!
वाटते सुधाही आता जळजळीत का हृदयाला?
कालचा विषाचा पेला विसळणे जरूरी होते!
...........प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खनिगतेलतंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१