सूर्यही हाईस आला, काय हाहाक्कार होता!
वाट त्यालाही दिसेना, केवढा अंधार होता!!
त्या सुगंधाच्या झडीने दाह अंगांगात झाला;
बरसली होती फुले की, बरसला अंगार होता?
ती तुझी वचने, तुझ्या त्या लाघवी शपथा, बहाणे.....
पांगळ्या माझ्या मनाला केवढा आधार होता!
खेळलो मी खेळ बुद्धया आंधळ्याकोशिंबिरीचा!
काय मी करणार दुसरे? आंधळा दरबार होता!!
दार ना ठोठावता त्या लागल्या हृदयात येवू....
फार पूर्वीचा स्मृतींचा आमचा शेजार होता!
कापले त्यांनी खिसे अन् लागले बिनघोर हिंडू.....
वाटले त्यांना जणू तो वैध भ्रष्टाचार होता!
हातचे टाकून जेव्हा चित्त आले साथ द्याया;
त्याचवेळी जाणले मी...तो तुझा होकार होता!
ऐट नाही, डौल नाही, छानछोकी ना बढाई;
चित्त माझे चोरणारा और तो शृंगार होता!
कैद ना सुरईत झालो कोणत्याही लालसेच्या!
वेगळा, अगदीच माझा वेगळा आकार होता!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१