घोट दु:खांचा रिचवला, अन् गझल झाली!

गझल
घोट दु:खांचा रिचवला, अन् गझल झाली!
अर्क जगण्याचा जिरवला, अन् गझल झाली!!

एवढ्या सहजी न आले शब्द हाताशी;
जीव मी माझा झुरवला, अन् गझल झाली!

चिंतनाची आत शाई, दौत हृदयाची!
टाक मी नुसता बुडवला, अन् गझल झाली!!

तुंबली वर्दळ स्मृतींची केवढी गर्दी!
मी खुला रस्ता  करवला, अन् गझल झाली!!

तो गझलसम्राट होता, शिष्य मी ज्याचा!
तोच मी कित्ता गिरवला, अन् गझल झाली!!

गायली मी वेदनांसाठीच अंगाई.....
शांत तो ठणका निजवला, अन् गझल झाली!

अडकली मतल्यात अन् मक्त्यामधे गाडी.......
मीपणा माझा झुकवला, अन्  गझल झाली!

पानगळ शिकवून गेली रीत फुलण्याची!
बहर अंगांगी मुरवला, अन् गझल झाली!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१