एक "होतकरू" पटकथा

गावाकडच्या एका शेतकरी कुटुंबातल्या दोन मुली घरकाम करून पैसे मिळवण्यासाठी शहरात आपल्या आत्याकडे राहतं असतात. त्यातली धाकटी मुलगी एका मुलाच्या प्रेमात पडते. दोघेजण एकत्र हिंडतात, फिरतात. मुलीची मोठी बहीण त्यांना फिरताना पाहते. ती आपल्या आईवडलांना सांगते. मुलगाही त्यांच्याच गावातल्या कुटुंबातला असतो. त्यामुळे आईवडील मुलाला ओळखत असतात. ते मुलीला त्याचा नाद सोडायला सांगतात. कारण मुलाला दारूचं व्यसन असतं. ती मुलगी मुलाशी संबंध तोडायला नकार देते. उलट मी त्याच्याशीच लग्न करीन म्हणून हट्ट धरून बसते. त्याच्याशी लग्न केलंस तर पुन्हा गावाला आमच्या घरात यायचं नाही म्हणून तिला आईवडील ताकीद देतात. त्यावर मोठी बहीण स्वत: पुढाकार घेऊन स्वत:च्या पैशाने त्यांचं लग्न लावून देते. मोठी बहीण दहावी पास असते व कामांत हुशार असते. तिला पैसे चांगले मिळत असतात नि तिला बचत करण्याची सवयही असते. धाकट्या मुलीचं ना शिक्षणात लक्ष होतं ना कामात ! लग्न रजिष्टर पद्धतीनं होतं. धाकट्या बहिणीचं वय किमान कायदेशीर मर्यादेपेक्षा कमी असल्यामुळे ती वयाचा पुरावा म्हणून आपल्या मोठ्या बहिणीचा दहावीनंतरचा शाळा सोडल्याचा दाखला सादर करते. दिसायला ती मोठ्या बहिणीपेक्षा थोराड असल्यामुळे रजिष्टर कार्यालयातल्या ऑफिसरचा तिच्यावर विश्वास बसतो. कागदोपत्री पाहता मोठी बहीण त्या मुलाची बायको असते.  
एक दिवस मोठ्या बहिणीला गावाकडून फोन येतो. धाकट्या बहिणीनं गावाला फोन केलेला असतो. वडील फोनवर बोलायला नकार देतात. तू केलंयस तुझं तू भोग म्हणून फोन ठेवतात. आईला आपल्या मुलीचा फोन आहे नी काहीतरी गडबड आहे हे कळतं. ती मुलीला फोन करते. फोनवर मुलीचं फक्त रडणं ऐकू येतं नि फोन कट होतो. आई पुन्हा फोन करते पण तो उचलला जात नाही. हे सर्व आई आपल्या मोठ्या मुलीला फोनवर सांगते नि तू तरी बघ म्हणून कळवळून सांगते. मोठी बहीण कामवाल्या घरातल्या माणसांची परवानगी घेऊन बहिणीची चौकशी करायला तिच्या घरी जाते. तिथे गेल्यावर कळतं की बहिणीचा नवरा दारू पिऊन आला होता नि बहिणीला लाथाबुक्क्यांनी मारत होता. भरीस भर म्हणून मारझोड होताना तिला तिच्या नणंदेनं नि सासूनं धरून ठेवलेलं असतं नि तिचा फोन काढून घेतलेला असतो. नवरा हॉस्पिटलामध्ये नोकरीला असतो नि लग्नापूर्वी कामात लक्ष न घालणारी धाकटी बहीण लग्नानंतर घरकामं करून महिना पाचसहा हजार कमावत असते.          
वरील गोष्टीतले उनाड बहिणीचं प्रेमप्रकरण, तिच्या मोठ्या बहिणीने त्यांचं प्रेमप्रकरण सफल होण्यासाठी पुढाकार घेणे (इतकं की वयासाठी आपला दाखला वापरू देणं), दारुड्या नवऱ्यापुढची तिची अगतिकता हे पाहता हा एखाद्या टीव्ही सीरियलच्या कथेचा किंवा चित्रपटकथेचा आराखडा वाटण्याची शक्यता आहे. पण ही सत्य घटना आहे. यातली मोठी बहीण आमच्याकडे राहणारी कामवाली मुलगी आहे. 
यावर एखाद्या निर्मात्याला एखादा चित्रपट सहज काढता येईल. प्रेमप्रकरणाचे, उपदेशाचे, मध्यस्थीचे अनेक प्रसंग यात घालता येतील. त्याशिवाय वयासाठी मोठ्या बहिणीचा दाखला वापरलेला असल्यामुळे एखाद्या ब्लॅकमेल करणाऱ्या व्हिलनलाही त्यात आणता येईल.